Satara News! मी माझ्या पगारात समाधानी आहे, त्यामुळे..! सरकारी अधिकाऱ्याने लावलेल्या फलकाची राज्यात चर्चा

Satara News : साताऱ्यात आपल्या प्रामाणिकपणाचे दर्शन घडवणारे सातारा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी सतीश बुद्धे यांनी सामान्य माणसासाठी फलक लिहून आपल्या प्रामाणिकपणाची एक ओळख दाखवली. यामुळे याची सध्या चर्चा सुरू झाली आहे.

या फलकाबद्दल अधिकाऱ्याचे कौतुक केले जात आहे. प्रशासकीय कामकाज करत असताना ग्रामीण भागातील लोकांचा पंचायत समितीशी संबंध येतो. घरकुलापासून ते घर , रस्ता, पाणी पुरवठा योजना दुरुस्ती , शाळेच्या खोल्या व इतर विकास कामांबाबत गटविकास अधिकाऱ्यांशी संपर्क येतो.

अधिकाऱ्यांना अनेकदा सातारा तालुक्यातील अनेक भागांमध्ये दौरे करावे लागतात. यामुळे त्यांनी आपला संपर्क नंबर व आपल्या निवेदन, तक्रारी व्हाट्सअप नंबरवर पाठवून लोकांची कामे लवकरात लवकर व्हावीत, यासाठी फलक लावलेला आहे. यामुळे लोकांमधून देखील एक समाधान व्यक्त केले जात आहे.

तसेच त्यांनी मी माझ्या पगारात समाधानी आहे, असे म्हणत एक वेगळाच संदेश दिला आहे. त्यांनी सातारा पंचायत समितीत त्यांची कारकीर्द कशी असेल याचे संकेत दिले आहेत. यामुळे जे अधिकारी पगार सोडून इतर काही मागणी करतात, त्यांच्यासाठी हा एक संदेश आहे.

यामुळे ग्रामीण भागात त्यांच्याबद्दल आदराची भावना निर्माण झालेली आहे. यामुळे सोशल मीडियावर देखील त्यांची जोरदार चर्चा सुरु आहे. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण देसाई यांनी सातारा पंचायत समितीमध्ये जाऊन प्रामाणिक अधिकाऱ्याचे स्वागत व कौतुक केलेले आहे. 

अनेकदा अधिकारी जागेवर सापडत नाहीत. यामुळे हेलपाटे मारावे लागतात. तसेच त्यांच्याशी बोलायचे झाले तर त्यांचा फोन नंबर नसतो. कामे करण्यासाठी पैशांची मागणी केली जाते. यामुळे हे अधिकारी सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत.