राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार बंडखोरीनंतर पहिल्यांदाच शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी दाखल झाले आहेत.
प्रतिभा पवार यांची भेट घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सिल्व्हर ओक येथे पोहोचल्याचे वृत्त आहे. यावेळी अजित पवार यांनी शरद पवार आणि प्रतिभा पवार यांची भेट घेतली. प्रतिभा पवार यांच्यावर आज ब्रीझ कँडी रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. येथे त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया त्याच्या हाताशी संबंधित होती. राष्ट्रवादी काँग्रेसने एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली आहे.
शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचा विवाह 1967 मध्ये झाला होता. राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये ‘काकी’ या नावाने प्रसिद्ध असलेल्या प्रतिभा पवार यांच्याकडे पक्षाच्या मार्गदर्शक म्हणून पाहिले जाते.
मात्र, त्या राजकारणात कधीच सक्रिय झाल्या नाहीत. प्रतिभा पवार यांचे वडील सदू शिंदे हे भारतीय क्रिकेट संघातील लेगस्पिनर होते. त्यांनी 1946 ते 1952 दरम्यान भारतासाठी सात कसोटी सामने खेळले.
प्रतिभा पवार राजकारणात नाहीत पण 2019 मध्ये अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत सरकार स्थापन केले तेव्हा त्यांना परत आणण्यात प्रतिभा पवार यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. याचा उल्लेख शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात केला आहे. प्रतिभा पवार आणि अजित पवार यांचे अतूट नाते होते, असे त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रात लिहिले आहे.