बंडामुळे उद्धव ठाकरेंना मोठा धक्का बसला होता. अनेक आमदारांनी त्यांची साथ सोडली होती. पण आता ते पुन्हा पक्षबांधणी करताना दिसून येत आहे. अनेक नेते त्यांच्या पक्षात प्रवेश घेत आहे. आता पेणचे माजी नगराध्यक्ष शिशिर धारकर यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे.
२५० गाडांचा ताफा घेऊन शिशिर धारकर हे सोमवारी मातश्रीवर दाखल झाले होते. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबतच पेण, सुधागड, रोहा विधानसभा मतदार संघातील कार्यकर्त्यांनीही ठाकरे गटात प्रवेश केला आहे.
शिशिर धारकर हे पेण अर्बन बँक घोटाळा प्रकरणातील आरोपी होते. पण त्यांना आता ठाकरेंनी पक्षात प्रवेश दिल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिशिर धारकर हे गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणापासून लांब होते. पण आता ते राजकारणात सक्रीय झाले आहे.
शिशिर धारकर हे पेणचे माजी नगराध्यक्ष आहे. त्यांना पेण अर्बन घोटाळ्याती मुख्य आरोपी ठरवण्यात आले होते. त्यांच्यावर ५०० कोटी रुपयांपेक्षा जास्तीचा घोटाळा केल्याचा आरोप आहे. त्यांनी स्थानिक नागरिकांचे पैसे बुडवल्याचेही म्हटले जाते.
गेल्या काही वर्षांपासून धारकर हे राजकारणात सक्रीय नाहीये. याआधीही त्यांची उद्धव ठाकरेंशी भेट झाली होती. त्यावेळी ते पक्षात प्रवेश करतील अशा चर्चा सुरु झाल्या होत्या. पण त्यांनी पक्षात प्रवेश केला नव्हता. आता मात्र ते २५० गाड्यांचा ताफा घेऊन पक्ष प्रवेशासाठी आले होते.
काही वर्षांपूर्वी शिशिर धारकर यांचे पेणच्या मतदार संघावर वर्चस्व होते. पण पेण अर्बन घोटाळ्यामुळे त्यांना मोठा धक्का बसला होता. आता पेणचे आमदार भाजपचे रविंद्र पाटील असून नगरपालिकेवरही भाजपचीच सत्ता आहे.
शिशिर धारकर यांच्या वडिलांचंही राजकारणात मोठं नाव आहे. ते काँग्रेस सरकारच्या काळात राज्यमंत्री होते. १९८० ते १९८६ व १९९० ते १९९६ या काळात आप्पासाहेब धारकर हे विधान परिषदेचे सदस्य होते. १९९३ मध्ये त्यांनी महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री म्हणून पद सांभाळले होते.