पुण्यातील शिवसेनेचा ढाण्या वाघ हरपला! उद्धव ठाकरेंचा आदेश येण्याआधीच सोडले जग

Avinash Rahane Passes Away : शिरूर लोकसभा मतदार संघातील कट्टर शिवसैनिक अ‍ॅड. अविनाश रहाणे यांचे एका खासगी रुग्णालयात निधन झाले. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाने गेली अनेक वर्षे ते आजारी होते. एक कट्टर शिवसैनिक म्हणून त्यांची ओळख होती.

1999 मध्ये राज्याचे विद्यमान सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात जेमतेम 8 हजारांनी त्यांचा पराभव झाला होता. आता 2024 च्या लोकसभेसाठी ते तयारी करत होते. अविनाश रहाणे 2004 पासून माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांच्यामागे भक्कमपणे उभे राहिले होते.

यामुळे त्यांना खासदारकीची हॅट्ट्रिक करता आली होती. आता 2024 मध्ये शिरूर लोकसभेसाठी आढळरावांनाच शड्डू ठोकून पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या आदेशाची वाट पाहत होते. मात्र आदेशाच्या आधीच त्यांचे निधन झाले आहे.

अ‍ॅड. अविनाश रहाणे यांनी गेल्या काही दिवसांपासून शिरूर लोकसभा मतदारसंघात चांगलीच पक्षबांधणी सुरू केली होती. मात्र त्यांचे दुःखद निधन झाले आहे. मधुमेह आणि उच्च रक्तदाबाने गेली अनेक वर्षे ते आजारी होते.

त्यांचे शिरूर लोकसभा मतदार संघात एक वजन होते. शिवाजीराव आढळराव यांना शिवसेनेत घेण्यापासून बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांचे नियोजनही अ‍ॅड. रहाणे करत होते. यामुळे ते ठाकरेंच्या जवळचे मानले जात होते.

2004, 2009, 2014 या तीनही लोकसभा निवडणुकीत अ‍ॅड. रहाणे हे शिवाजीराव आढळराव यांचे प्रचारप्रमुख म्हणून राहिले. तसेच निवडणुका देखील जिंकून दिल्या. त्यांच्या जाण्याने सध्या हळहळ व्यक्त केली जात आहे.