शिवाजी महाराजांची वाघनखं लंडनहून महाराष्ट्रात आणणार; सरकारनं उचललं ‘हे’ मोठं पाऊल

आपल्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास माहिती नसलेला व्यक्ती नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यामध्ये त्यांनी अनेक लढाया जिंकल्या. तेव्हा महाराजांनी आदिलशाहचा सेनापती अफझल खान याला ठार मारण्यासाठी वापरलेले वाघनख परत देण्यास ब्रिटनच्या अधिकाऱ्यांनी सहमती दिली आहे.

यामुळे याकडे सर्व शिवप्रेमींचे लक्ष लागले आहे. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार येत्या काही दिवसांत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यासाठी लंडनला जाणार आहेत. यामुळे महाराजांचा इतिहास पुन्हा एकदा आपल्यापुढे येणार आहे.

याबाबत मंत्री मुनगंटीवार म्हणाले, की, सर्व ठरल्याप्रमाणे घडले तर, शिवाजी महाराजांचे वाघनखं काही महिन्यांतच महाराष्ट्रात येईल. ब्रिटनच्या अधिकाऱ्यांचे पत्र आम्हाला मिळाले आहे. यामध्ये त्यांनी वाघनखं परत देण्याचे मान्य केले आहे.

शिवाजी महाराजांनी अफझलखानाला मारले त्या दिवसाच्या दिनानिमित्त आपल्याला ते परत मिळावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत, असेही ते म्हणाले. महाराजांची वाघनखं हा इतिहासाचा अमूल्य ठेवा आहे. त्याच्याशी राज्यातील जनतेच्या भावना जोडल्या गेल्या आहेत.

ही वाघनखं महाराष्ट्रात येणे हे प्रत्येक मराठी माणसासाठी ऐतिहासिक घटना ठरणार आहे. यामुळे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आम्ही जगदंबा तलवार यांसारख्या इतर वस्तू देखील परत मिळतील का? हे पाहणार आहोत, असेही ते म्हणाले.

दरम्यान, महाराजांनी ज्या वाघनखांनी अफझल खानाचा वध केला ते वाघनखं सध्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट म्युझियममध्ये आहेत. ते भारतात येण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले आहेत. आता ते कधी येणार हे लवकरच समजेल.