ट्रेनमध्ये ४ लोकांवर गोळीबार करणाऱ्या चेतनबाबत धक्कादायक माहिती आली समोर; केसला वेगळं वळण…

सोमवारी पालघरमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. रेल्वेत एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांचा गोळी मारुन जीव घेतला होता. पहाटे साडेपाचच्या दरम्यान जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली होती.

चार जणांमध्ये तीन प्रवासी होते, तर एक एएसआय अधिकारी होता. चेतन सिंग असे आरोपीचे नाव असून पोलिस त्याची चौकशी करत आहे. मानसिक तणावातून त्याने असे केल्याचे चौकशीत समोर आले आहे.

अशात चेतन सिंगची अजूनही चौकशी सुरु असून वेगवेगळे खुलासे होताना दिसत आहे. कॉन्स्टेबल चेतन सिंगने त्याची वैद्यकीय माहिती लपवून ठेवली होती, असा मोठा खुलासा झाला आहे. रेल्वे मंत्रालयाने याबाबत माहिती दिली आहे.

चेतन सिंगने घेतलेल्या वैद्यकीय उपचारांची कोणतीही माहिती आमच्याकडे नाही. त्याने त्याच्या स्तरावर उपचार घेतले. त्याची कोणतीही अधिकृत नोंद रेल्वेकडे नाही. त्यानं आणि त्याच्या कुटुंबाने याबद्दलची माहिती लपवली. त्यामुळे याप्रकरणाचा आणखी तपास करण्यात येणार आहे, असे मंत्रालयाने म्हटले आहे.

चेतन सिंगला एक आजार होता. त्याला हॅल्युसिनेशनचा त्रास व्हायचा, असे समोर आले आहे. कॉन्स्टेबलची नियमितपणे चाचणी होत असते. पण चाचणीमध्ये चेतनच्या आजाराची कोणतीही नोंद आढळून आलेली नाही.

चेतन सिंगला आजार आहे हे त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना माहिती होते. पण त्यांनी कोणीही याबाबत माहिती दिली नव्हती. त्यानं उपचाराची ही माहिती गुपित ठेवली होती. रेल्वेकडून ठराविक वेळेनंतर नियमितपणे चाचण्या होत असतात, पण त्याने त्याच्या आजाराबद्दल काहीही सांगितले नव्हते, असे रेल्वे मंत्रालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण येण्याची शक्यता आहे.