दुचाकी अडवली, कोयते काढले अन् सपासप वार; साताऱ्यात भरदिवसा घडली भयानक घटना

राज्यभरात गुन्हेगारीच्या अनेक घटना घडत आहे. अशीच एक घटना आता कराडमधून समोर आली आहे. जुन्या रागातून काही तरुणांनी एका तरुणावर कोयत्याने वार केले आहे. संबंधित घटना ही मंगळवारी दुपारी घडली आहे.

कराड येथे असणाऱ्या सह्याद्री दुध डेअरीसमोर त्या तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या हल्ल्यामध्ये आयेजरजा अल्ताफ मुजावर हा तरुण गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर एका रुग्णालयात उपचार सुरु आहे.

कराड पोलिस ठाण्यात याप्रकरणी काही तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी सुरज धुमाळ, अजय रायते, प्रथमेश बेंद्रे यांच्यासह आणखी एकावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यातही घेतले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आयेजरजा हा तरुण कराड शहरातील गुरुवार पेठेत राहतो. त्याचा शिवराज माने या तरुणासोबत आधी वाद झाला होता. कारण त्याचे मित्र आयेजरजाच्या गल्लीतील मुलांना शिवीगाळ करत होते.

त्यामुळे त्या तरुणांचा आयेजरजावर राग होता. मंगळवारी दुपारी तो एका कामासाठी घराबाहेर पडला असताना डेअरी समोर अचानक त्याला त्या तरुणांनी अडवले. त्यानंतर त्यांच्यात तिथे वाद झाला. तुला आता जिवंतच सोडत नाही, असे म्हणत त्या तरुणांनी डिकीतले कोयते काढले आणि त्या कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न केला.

काही वार आयेजरजाने चुकवले पण एक वार त्याच्या हातावर लागला. त्यानंतर त्या तरुणांनी त्याला फरशीनेही मारले. या हाणामारीत तो गंभीर जखमी झाला होता. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी आयेजरजाला वाचवले. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण या घटनेमुळे संपुर्ण परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.