दारूड्या ट्रकचालकाची दुचाकीला धडक, बापासह ८ वर्षाच्या लेकाचा जागीच मृत्यू; आईचा ह्रदय पिळवटून टाकणारा आक्रोश

राज्यात रस्ते अपघाताचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. रोज अपघाताच्या बातम्या समोर येत आहे. अनेकांना यामध्ये आपला जीवही गमवावा लागत आहे. पुणे जिल्ह्यातून अशीच एक घटना समोर आली असून या अपघातात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे.

शिरुरमध्ये हा अपघात झाला आहे. पाबळ-शिरुर रस्त्यावरुन मद्यधुंद अवस्थेत एक ट्रकचालक ट्रक चालवत होता. त्यावेळी त्याने एका दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपुर्ण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

वडिलांचे नाव भाऊसाहेब काळूराम चौधरी असे होते. त्यांचे वय ४३ वर्षे होते. तर त्यांचा मुलगा अश्विन भाऊसाहेब चौधरी हा फक्त ८ वर्षांचा होता. त्याचाही यामध्ये मृत्यू झाला आहे. तर भाऊसाहेब यांच्या पत्नी अनिता या गंभीर जखमी झाल्याअसून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

याप्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक अमोल कदम याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी ट्रकचालकाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे. तो दारु पिलेला असल्याचे चौकशीत समोर आले आहे.

शिरुर पाबळ या रस्त्याने रात्रीच्या वेळी भाऊसाहेब त्यांच्या पत्नीला आणि मुलाला घेऊन जात होते. त्यावेळी हॉटेल बैठक समोर पाठीमागून एक ट्रक आला आणि त्याने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली होती. हा अपघात इतका भीषण होता की दुचाकी ट्रकच्या खाली आली होती.

या अपघात भाऊसाहेब आणि मुलगा अश्विन रस्त्यावर पडले होते. त्यावेळी त्यांच्या अंगावरून ट्रकचे चाक गेले. त्यामुळे दोघांचाही जागीच मृत्यू झाला, तर अनिता या गंभीर जखमी झाल्या. त्यानंतर स्थानिकांनी लगेचच पोलिसांना याबाबत माहिती दिली. पोलिसांनी महिलेला रुग्णालयात दाखल केले आहे, तर त्या ट्रकचालकाला अटक केली आहे.