३५ वर्षांनंतर त्याला पुराच्या पाण्यात सापडली ‘आई’, ६ महीन्यांचा असताना…; घटना ऐकून डोळे पाणावतील

आईपासून लहानपणीच वेगळे होणारे मुलं ३०-३५ वर्षानंतर पुन्हा आईला भेटतात हे तुम्ही अनेकदा चित्रपटांमध्ये बघितले असेल. पण अशीच एक घटना खऱ्या आयुष्यात घडली आहे. पंजाबमध्ये एका मुलाला ३५ वर्षांनंतर आपली आई भेटली आहे.

पंजाबच्या पटियालामधून ही घटना समोर आली आहे. सध्या देशभरात मुसळधार पाऊस होत आहे. अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. पंजाबमध्येही अशीच स्थिती आहे. नद्यांची पातळी वाढत आहे. अनेक गावांमध्ये पुराचे पाणी आले आहे.

जगजीत सिंग नावाचा व्यक्ती अशाच एका पुरग्रस्त गावात मदतीसाठी गेला होता. त्यावेळी त्याला तब्बल ३५ वर्षांनंतर त्याची आई भेटली आहे. २० जुलैला या माय-लेकांची भेट झाली आहे. सोशल मीडियावर त्यांच्या भेटीचा व्हिडिओही व्हायरल झाला आहे.

त्या दोघांची भेट झाली तेव्हा दोघांच्याही डोळ्यातील अश्रू अनावर झाले होते. जगजीत हा सहा महिन्यांचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं. त्यावेळी त्याची आई हरजीत कौर यांनी दुसरं लग्न केलं होतं.

दोन वर्षांचा होईपर्यंत जगजीत त्याच्या आईसोबत होता. पण त्यानंतर त्याचे आजी-आजोबा त्याला घेऊन गेले. जगजीत जेव्हा मोठा होत होता, तेव्हा त्याला तुझ्या आईवडिलांचे कार अपघातात निधन झाल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे आपले आईवडिल या जगात नाही, असेच जगजीतला वाटत होते.

आता ३५ वर्षांनतर बोहारपूर गावात दोघांची भेट झाली आहे. तो एका एनजीओच्या माध्यमातून त्या गावात मदतीसाठी गेला होता. त्यावेळी आत्याशी बोलणं झालं तेव्हा बोलता बोलता आत्या बोलून गेली की आईचं गावही तेच आहे.

बोहरापूर येथे त्याचे आजी-आजोबा राहत होते, असे त्याला सांगण्यात आले. त्यावेळी बोहारपूर गावात पोहचल्यानंतर गेल्यानंतर जगजीतने आजीची भेट घेतली. त्यावेळी आपली आई हयात असल्याचे त्याला कळाले. त्यानंतर आजीने दोघांची भेट घडवून दिली. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे हा प्रसंग घडला आहे. त्यावेळी दोघांच्या डोळ्यात अश्रू आले होते.