पत्नी, पुतण्याला संपवून स्वत:वर गोळीबार, ACP गायकवाडांच्या घरात त्यादिवशी नक्की काय घडलं? वाचा..

सोमवारी पुण्यातील बाणेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली होती. अमरावती पोलिस दलातील सहाय्यक पोलिस आयुक्त भारत गायकवाड यांनी गोळ्या झाडून पत्नी आणि पुतण्याची हत्या केली. त्यानंतर त्यांनी स्वत:लाही गोळी मारुन संपवलं होतं.

भारत गायकवाड हे अमरावती पोलिस दलामध्ये काम करत होते. ते पुढच्यावर्षी निवृत्तही होणार होते. ते ३१ मे २०२४ ला पोलिस सेवेतून निवृत्त होणार होते. पण सोमवारी पहाटेच्या सुमारास अशी घटना घडल्यामुळे एकच खळबळ उडाली. या गोष्टीला आता पाच दिवस झाले असून अजूनही या घटनेमागेचे गुढ कायम आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारत गायकवाड हे ५७ वर्षांचे होते. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी गावात त्यांचा जन्म झाला होता. एमपीएससी परीक्षा पास करुन ते १९८८ साली पोलिस दलात रुजू झाले होते. मुंबईत पीएसआय म्हणून त्यांची पहिली पोस्टिंग झाली होती.

२०२१ मध्ये अमरावतीत एसीपी म्हणून त्यांनी कामाला सुरुवात केली. ते पुण्यात अधूनमधून येत राहायचे. यावेळी ते ८ दिवसांची सुट्टी मंजूर करुन पुण्यात आले होते. तेव्हाच अशी भयानक घटना घडली आहे. याबाबत त्यांच्या कुटुंबाने घरात नक्की काय घडलं हे सांगितले आहे.

घटनेच्या रात्री साडेतीनच्या सुमारास भारत गायकवाड यांच्या रुममध्ये अचानक मोठमोठ्याने भांडणाचा आवाज येऊ लागला. त्यानंतर अचानक गोळीचा आवाज आला. गायकवाड यांची दोन मुलं, पुतण्या आणि आई हे त्यांच्या बेडरुमजवळ धावले.

त्यानंतर त्यांनी दार ठोठवण्यास सुरुवात केली. पण कोणीही दार उघडत नव्हते. पण पुतण्या दीपकने दुसऱ्या एका चावीने दरवाजा उघडला. तो आत जाताच त्यालाही भारत गायकवाड यांनी गोळी मारली. त्यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

घरच्यांनी बघितले की आतमध्ये भारत गायकवाड यांच्या पत्नीला गोळी मारलेली होती. मोठ्या मुलाने हे पाहिल्यानंतर गायकवाड यांच्या हातातून बंदूक खेचण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी भारत गायकवाड यांनी त्याला धमकावलं आणि तु इथून जा नाही तर तुलाही गोळी घालेल, असे म्हणत मोठ्या मुलाला बाहेर काढून दरवाजा ढकलला आणि स्वत:ला गोळी मारुन घेतली.

त्यानंतर मोठ्या मुलाने दरवाजा उघडला तेव्हा तिघांचे मृतदेह तिथे पडलेले होते. घटनेनंतर मुलाने चतुश्रृंगी पोलिसांना फोन लावून या घटनेची माहिती दिली. पोलिस या घटनेचा तपास करत आहे. पण भारत गायकवाड यांनी नक्की असे का केले असावे? असा प्रश्न सर्वांना पडला आहे.