स्टेशनवर झोपून दिवस काढले; ‘त्या’ १ हजार रुपयांनी घडवला चमत्कार, आता आहे ३५ हजार कोटींच्या कंपनीचे मालक

सत्यनारायण नुवाल हे सध्याच्या घडीचे एक मोठे नाव आहे. करोडो रुपयांची त्यांची संपत्ती आहे. पण एकेकाळी ते खूप गरीब होते. त्यांनी परिस्थितीशी हार मानली नाही आणि झुंज देत आपले नशीब पालटले. अशा प्रकारे एकेकाळी रेल्वे स्थानकावर झोपलेली व्यक्ती ३६ हजार कोटी रुपयांच्या कंपनीची मालक बनली आहे.

सोलर इंडस्ट्रीजचे मालक सत्यनारायण नुवाल असे त्यांचे नाव आहे. त्यांनी जिद्द आणि मेहनतीच्या बळावर हजारो कोटींचे साम्राज्य उभे केले. राजस्थानी कुटुंबात जन्मलेल्या सत्यनारायण नुवाल यांचे वडील सरकारी कार्यालयात क्लार्क होते. १० वी पास झाल्यावर त्यांनी शाळा सोडली आणि नोकरीच्या शोधात पायपीट करू लागले.

ते चांगल्या नोकरीच्या शोधात राजस्थानहून महाराष्ट्रात आले. सुरुवातीला नोकरी मिळत नसल्याने ते अनेक दिवस रेल्वे स्थानकावर झोपले. नोकरी शोधत असताना एकेदिवशी त्यांची भेट अब्दुल सत्तार भाईशी झाली. त्यांच्याकडे स्फोटकांचा परवाना होता.

दरम्यान, अब्दुल यांच्याकडे परवाना तर होता मात्र ते व्यवसाय करत नव्हते. त्यांनी काही रुपये भाडे देऊन अब्दुल सत्तार यांच्याकडून परवाना घेतला आणि एक नवीन सुरुवात केली. नुवाल लोकांना स्फोटकांसाठी विशेषतः कोळशाच्या खाणींमध्ये वापरल्या जाणार्‍या दारूगोळ्यासाठी जागा भाड्याने देऊ लागले.

जागेनंतर त्यांनी स्वतः स्फोटके तयार करण्याचा निर्णय घेतला आणि व्यवसाय नागपूरला हलवला. ते २५० रुपयांना स्फोटके खरेदी करायचे आणि ८०० रुपयांना विकायचे. यामध्ये त्यांनी चांगले पैसे कमवले. १९९५ मध्ये त्यांनी स्फोटकांचे पहिले युनिट सुरू केले. पुढे त्यांनी सोलर एनर्जी इंडस्ट्रीजची सुरुवात देखील केली.

आज त्यांच्या कंपनीत ७ हजार ५०० लोक कार्यरत असून सोलर एनर्जी इंडस्ट्रीजचे मूल्य ३५ हजार कोटींहून अधिकचे झाले आहे. अब्जाधीशांच्या यादीत सत्यनारायण नुवाल यांची एकूण संपत्ती सध्या $१.८ अब्जवर पोहोचली आहे. यामुळे त्यांनी कमी वयात आणि अतिशय खडतर परिस्थितीत हे यश संपादन केले आहे.