कोकणातील ‘या’ गावात जमिनीखालून येऊ लागले विचित्र आवाज; नागरिक घाबरले, प्रशासनाचा हाय अलर्ट

रायगड जिल्ह्यातील महाड भागातून एक हैराण करणारी बातमी समोर आली आहे. कसबे शिवथर गावातील भूगर्भातून विचित्र आवाज येत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे तेथील ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मोठ्या संकटाची चाहूल तर नाही ना असे ग्रामस्थांना वाटत आहे. त्यामुळे महाडचे प्रांत अधिकारी ज्ञानोबा बनापुरे, पोलिस निरीक्षक मारुती आंधळे आणि प्रशासनाचे पथक यांनी गावाला भेट दिली आहे.

त्या सर्वांनी गावकऱ्यांना सुचना दिल्या आहेत. तसेच या भागाची तपासणी करण्यासाठी भूगर्भ शास्त्रज्ञांना बोलवण्यात आले आहे. विचित्र आवाज येत असल्यामुळे ग्रामस्थांना सतर्क राहण्याचा सुचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहे.

हे आवाज नक्की कशामुळे येत आहे? याचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. महाड तहसीलदार प्रांत या सगळ्या घडामोडींवर लक्ष ठेऊन आहे. गेल्या दोन दिवसांपासून हे आवाज येत आहे. अशात शनिवारी अचानक मोठा आवाज झाल्यामुळे ग्रामस्थांनी तातडीने याबाबत प्रशासनाला माहिती दिली होती.

विचित्र आवाजांमुळे गावातील नागरिक खुप घाबरलेले आहे. या दुर्गम भागात ७० ते ८० घरं आहेत. ४ ऑगस्ट रोजी अधून मधून याठिकाणी आवाज येत होते. दोन तीन दिवस असेच झाले. पण त्यानंतर रात्रीच्या वेळी जमिनीतून मोठा आवाज झाला. त्यामुळे नागरिक घाबरले आणि त्यांनी प्रशासनाला याबाबत कळवले.

प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. आवाज नक्की कोणत्या कारणामुळे येत आहे, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे नागरिकांनी राहते घर सोडून एका मंदिराचा आसरा घेतला आहे. आता ते आवाज नक्की कसले आहेत? याचा तपास प्रशासन करत आहे.