Sunil Gavaskar : सेमीफायनलचा दिवस हा टीम इंडियासाठी मोठा दिवस होता. यामध्ये टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध मोठा विजय मिळवला. वानखेडे स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात ७० धावांनी विजय मिळवला. या सामन्यात न्यूझीलंड भारताला तगडी स्पर्धा देत होता. त्याचे दोन फलंदाज खेळपट्टीवर सेट झाले होते. यामुळे हा विजय सुखर नव्हता.
असे असताना सामन्यानंतर खेळपट्टी बदलण्यात आल्याची टीका अनेकांनी केली आहे. यावर बोलताना सुनील गावसकर चांगलेच संतापले, ते म्हणाले की, जे हरामखोर भारतीय फिरकी गोलंदाजांना मदत करण्यासाठी खेळपट्टी बदलण्यात आली असं सांगत आहेत ते लोक गप्प बसतील अशी मला अपेक्षा आहे.
लोकांच्या नजरा वेधून घेण्यासाठी भारतीय संघावर टीका करायचं थांबवा. तुमची बडबड वायफळ आहे. जरी खेळपट्टी बदलली असली तरी ती टॉसपूर्वी बदलली. टॉस झाल्यानंतर किंवा अर्धा सामना झाल्यानंतर खेळपट्टी बदलेली नाही. तुम्ही वर्ल्ड कपसाठीच्या संघाबद्दल बोलत आहात. तुम्ही त्या खेळपट्टीवर खेळून जिंकला पाहिजे. भारताने हे करुन दाखवले आहे, असेही गावसकर म्हणाले.
अनेक देशांचा सहभाग असलेल्या स्पर्धेत भारत अंतिम सामन्यात पोहोचतो तेव्हा तो अभिमानाचा क्षण असतो. वर्ल्ड कपसारखी स्पर्धा असेल तर ही बाब अधिकच वेगळी आणि खास असते. भारताने अगदी दिमाखदार पद्धतीने फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
दरम्यान, भारतीय फिरकी गोलंदाजांना मदत व्हावी, म्हणून खेळपट्टी बदलण्यात आल्याचा दावा केला गेला. मुंबई क्रिकेट असोसिएशन आणि बीसीसीआयने भारतीय फिरकी गोलंदाजांना मदत व्हावी या हेतूने ऐनवेळी खेळपट्टी बदलण्यात आल्याच्या बातम्याही काही माध्यमांनी दिल्या होत्या.
सध्या आतापासूनच हे लोक अहमदाबादमधील खेळपट्टीबद्दल बोलत असून ती खेळपट्टीही बदलल्याचं म्हणत आहेत, असेही गावसकर म्हणाले. आता फायनलमध्ये काय होणार हे लवकरच समजेल.