Supreme Court : कोलकत्ता उच्च न्यायालयातील दोन न्यायाधीशांमध्ये एका खटल्याच्या सुनावणीवरून खडाजंगी झाली. यामुळे मोठा गोंधळ उडाला. आता याची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. यामुळे याची चर्चा रंगू लागली आहे. जात प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणाची सुनावणी करताना उच्च न्यायालयाचे न्यायाधीशांमध्ये वाद झाला होता.
यामुळे सर्वोच्च न्यायालयाने हे प्रकरण आपल्याकडे वर्ग केले आहे. या प्रकरणाची सुनावणी आता सर्वोच्च न्यायालयातच होणार आहे. न्यायाधीश अभिजित गांगुली आणि न्यायाधीश सौमेन सेन यांच्यात हा वाद झाला होता.
या वादाची दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा निर्णय दिला. या खंडपीठात न्यायमूर्ती संजीव खन्ना, न्यायमूर्ती बीआर गवई, न्यायमूर्ती सूर्यकांत आणि न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांचाही समावेश करण्यात आला आहे.
निकाल देताना न्यायाधीश सौमेन सेन यांच्या अध्यक्षतेखालील उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने स्थगितीचा आदेश दिला होता. दरम्यान याकडे न्यायाधीश अभिजीत गांगुली यांनी दुर्लक्ष करत सीबीआय चौकशीचे निर्देश दिले होते. यामुळे प्रकरण वाढले होते.
यावरून दोन्ही न्यायाधीशांमध्ये वाद झाला होता. परंतु हा निकाल देताना न्यायाधीशांवर टिप्पणी करण्यास सरन्यायाधीशांनी नकार दिला. न्यायाधीशांवर टिप्पणी केली तर कोर्टाच्या कामकाजावर याचा परिणाम होईल, असे यावेळी सांगण्यात आले.
यामुळे हे प्रकरण बरेच चर्चेत राहिले आहे. याबाबत अजूनही माहिती घेतली जात आहे. मात्र दोन न्यायाधीशांमध्ये झालेल्या या वादाची चर्चा चांगलीच गाजली आहे.