Maratha Reservation : मराठा सर्वेक्षणाच्या कामात निष्काळजीपणा भोवला, चांगली सरकारी नोकरी गेली; एका चुकीची मोठी शिक्षा

Maratha Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. राज्यभरात मराठा सर्वेक्षणाचे काम सुरू आहे. सर्वेक्षण करण्यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. पण हे सर्वेक्षण करताना वेगवेगळे प्रकार समोर येत आहेत. नुकताच चंद्रपुरातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

मराठा सर्वेक्षणात चंद्रपुरात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी मनपा कर्मचाऱ्यावर निलंबणाची कारवाई करण्यात आली आहे. सुनील माळवे नावाच्या या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण पूर्ण करूनही काम स्वीकारले नाही. अनेकदा सुचना देऊनही काम सुरु न केल्याने त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली.

मराठा समाजाचे सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक मागासलेपण तपासण्यासाठी हे सर्वेक्षण केले जात आहे. चंद्रपूर महानगरपालिकेतर्फे 49 पर्यवेक्षक आणि 825 प्रगणकांची नियुक्ती करण्यात आली आहे. या सर्वांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र, माळवे यांनी प्रशिक्षण पूर्ण करूनही काम स्वीकारले नाही.

या सर्वेक्षणाला दोन दिवसांचा अतिरिक्त वेळ मिळाला असला तरी ते निश्चित कालावधीत व काटेकोरपणे होणे आवश्यक असल्याचे चंद्रपूर मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी सर्व नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

मुंबईत मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले सर्वेक्षण जवळपास पूर्ण झाले आहे. मुंबईत 99.45 टक्के सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. तर, तब्बल 10.5 टक्के मुंबईकरांनी सर्वेक्षण करण्यास नकार दिल्याची माहिती सर्वेक्षणाच्या आकडेवारीतुन समोर आली आहे.

पुण्यात 55% मराठा समाजाचे सर्वेक्षण पूर्ण झाल आहे. मावळ तालुक्यात सर्वाधिक 81 टक्के काम पूर्ण झाल आहे. तर, मुळशी, आंबेगाव आणि इंदापूर तालुक्यात सर्वात कमी लोकांचं सर्वेक्षण करण्यात आले आहे. मराठा आरक्षणासाठीचे सर्वेक्षण लवकरात लवकर पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.