गेल्या आठवड्यात पुण्यात एका अपघातात दोघांचा मृत्यू झाला. बड्या बापाच्या पोराने दारूच्या नशेत हे कृत्य केले. यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. यामुळे हे प्रकरण आता चांगलंच पेटल आहे. आता पुणे अपघातप्रकरणात धनिकपुत्राला वाचवण्यासाठी ससून रुग्णालयातील डॉक्टरांनी गैरकृत्य केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
हे अपघात उचलून धरणारे काँग्रेसचे कसब्याचे आमदार रविंद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करुन धक्कादायक आरोप केले आहेत. यामुळे पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. ज्या रात्री हा अपघात झाला त्या रात्री केवळ ससून रुग्णालयातील डॉक्टरांनीच नव्हे तर अनेकांनी ईमान विकले, असे धंगेकर यांनी म्हटले आहे, तसेच त्यांनी या प्रकरणी अनेकांवर गंभीर आरोप केले आहेत.
धंगेकर यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले की, पुण्यातील कल्याणीनगर कार अपघात प्रकरणात ससुन रुग्णालयाच्या 2 डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तुम्हाला आम्हाला काही तासात मिळणारे ब्लड रिपोर्ट या केसमध्ये जेव्हा सात दिवस होऊनही मिळत नव्हते तेव्हाच हा प्रकार संशयास्पद वाटत होता.
याच ससूनमध्ये मयत अश्विनी कोस्टा यांच्या नातेवाईकांनी मृतदेह अजून अर्धा तास शवगृहात ठेवा, आमची अँब्युलन्स येत आहे, अशी विनंती केली होती. मात्र, रुग्णालय प्रशासनाने अर्धा तास वाढवून द्यायला देखील नकार दिला होता. हे वाटतं तेवढ सोप्पं नाही. त्या रात्री अनेकांनी आपले ईमान विकले आहेत.
आता ते हळूहळू जगासमोर येईल, असे रविंद्र धंगेकरांनी म्हटले आहे. यामुळे धंगेकर येणाऱ्या देखील याबाबत अजूनच आक्रमक होणार असल्याचे दिसून येत आहे. ससून रुग्णालयातील दोन डॉक्टरांनी रक्ताच्या नमुन्यांची अदलाबदल केल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच डॉ. अजय तावरे आणि डॉ. श्रीहरी हळनोर यांना अटक करण्यात आली आहे.
त्यांनी हे नमुने बदलण्याची 3 लाख रुपये घेतले असल्याची माहिती आहे. अग्रवाल कुटुंबीयांच्या नातेवाईकांनी या दोघांना पैशांचे आमिष दाखवले. विशाल अग्रवाल याने अजय तावरे यांना फोन केल्याची माहिती कॉल डिटेल्समधून समोर आली आहे. यामुळे आता सगळंच सिद्ध झाले आहे.
या दोघांनीही अल्पवयीन मुलगा अल्कोहोल टेस्टमध्ये निर्दोष ठरावा, यासाठी त्याच्या रक्ताच्या नमुन्यांऐवजी एका दुसऱ्याच रुग्णाच्या रक्ताचे सॅम्पल्स फॉरेन्सिक लॅबकडे दिले. पुणे पोलिसांनी या दोघांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरु केली आहे. यामध्ये अजून बडी नावे पुढे येतील अशीही शक्यता आहे.
या चौकशीतून आणखी काय निष्पन्न होणार, हे पाहावे लागेल. दरम्यान, या प्रकरणी आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे आक्रमक झाल्या असून याबाबत सत्य बाहेर येण्यासाठी आंदोलने केली जात आहेत. आता अजून कोण कोण या प्रकरणी अडकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.