सध्या भारताच्या इस्रोचं जगभरात कौतुक केलं जातं आहे. याचे कारण म्हणजे चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर सॉफ्ट लँडिंग केले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करण्याची किमया याआधी कोणत्याही देशाला जमलेली नव्हती. यामुळे जगभरात भारताचे नाव झाले.
असे असताना मात्र रांचीतील हेवी इंजिनीअरिंग कॉर्पोरेशनच्या अभियंत्यांना पगार मिळालेला नाही. याच अभियंत्यांनी चांद्रयानसह अन्य मोहिमांमध्ये वापरण्यात आलेले लॉन्चपॅड तयार केले आहे. यामुळे सरकारने यांच्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.
त्यांनी सरकारी नोकरी असूनही गेल्या १८ महिन्यांपासून त्यांना वेतन मिळालेले नाही. यामुळे याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान, एचईसीमध्ये कार्यरत असलेल्या दीपक कुमार यांची घरातील आर्थिक परिस्थिती बेताची आहे. यामुळे त्यांना उदरनिर्वाह करण्यासाठी ते इडली विकत आहेत.
यामध्ये काम करणाऱ्या एचईसीच्या २८०० कर्मचाऱ्यांची हीच परिस्थिती आहे. यामुळे जगात नाव झाले असले तरी कामगारांची परिस्थिती वेगळी आहे. दीपक यांची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. यामुळे अनेकांची परिस्थिती समोर आली.
रांचीतील धुर्वा परिसरात दीपक यांचे लहानसे दुकान आहे. याठिकाणी त्यांचे आयुष्य सुरू आहे. याबाबत ते म्हणाले, एचईसीमध्ये ८ हजार रुपयांच्या पगारावर रुजू झाले. पगार मिळाला नाही म्हणून सुरुवातीला क्रेडिट कार्डने घर चालवले. मात्र पुढे 2 लाखांचे कर्ज झाले.
नंतर नातेवाईकांकडून पैसे उधार घेतले. आता डोक्यावर ४ लाखांचे कर्ज आहे. अनेकांनी उधारी बंद केली. पत्नीचे दागिने गहाण ठेवले आहेत. कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे आता इडलीचे दुकान सुरू केले. यातून कुटूंबाचा उदरनिर्वाह करतो.