गुरं चारायला गेलेल्या बापाला दिसला पोटच्या पोराचा झाडाला लटकलेला सांगाडा; भयावह घटनेने उडाली खळबळ

खानापूर तालुक्यातील वड्डेबैल नजिकच्या जंगलात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी घरातून अडीच महिन्यापासून बेपत्ता असलेल्या 21 वर्षीय युवकाचा सांगाडा एका झाडावर फासावर लटकत असल्याचे दिसून आले.

चरायला सोडलेल्या जनावरांना शोधण्यासाठी गेलेल्या मृत युवकाच्या वडिलांनाच झाडावरील त्याचा सांगाडा दिसला. यामुळे त्यांना एकच धक्का बसला. वैभव हा 23 जूनपासून बेपत्ता झाला होता. अनेक ठिकाणी त्यांचा शोध घेण्यात आला.

याबाबत वैभवचे वडील परशराम यांनी तो बेपत्ता झाला असल्याची तक्रार नंदगड पोलीस ठाण्यात नोंदवली होती. मृत युवकाचे नाव वैभव परशराम पाटील (वय 21 रा वड्डेबैल, ता खानापूर) असे आहे.

बेपत्ता झाल्यानंतर सर्वत्र शोध घेऊन देखील त्याचा पत्ता लागला नाही. तो कधीतरी घरी येईल. या आशेवर घरचे होते. मात्र या घटनेने त्यांना धक्काच बसला. दरम्यान, वैभवचे वडील परशराम जवळील जंगलात आपली जनावरे चरावयास सोडतात.

नंतर दुपारच्या सुमारास आपल्या जनावरांना पुन्हा घरी घेऊन जाण्यासाठी त्यांना शोधतात. गुरांना शोधत असताना एका झाडावर त्यांना एक मानवी सांगाडा फासावर लटकलेला आढळला. त्यांनी जवळ जाऊन बघितले तर हा आपला मुलगाच असल्याचे दिसून आले.

आपला मुलगा परशराम याचेच असल्याचे त्यांच्या लक्षात आले. याबाबत त्यांनी इतरांना माहिती दिली. दरम्यान, वैभवने आत्महत्या केली की हा खुनाचा प्रकार आहे? याबाबत पोलिसांकडून शोध सुरू आहे. या घटनेची नंदगड पोलीस ठाण्यात नोंद झाली असून अधिक तपास सुरू आहे.