सध्या वाघ आणि बिबट्याचा लोकवस्तीकडे जाण्याचा कल वाढला आहे. आता गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज तालुक्यातील फरी-झरी जंगल परिसरात मोठ्या पट्टेदार वाघाने हल्ला करून एका महिलेला ठार मारल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
यामध्ये महानंदा दिनेश मोहुर्ले (४८) या महिलेचा मृत्यू झाला आहे. महानंदा मोहुर्ले ही शिवराज-फरी मार्गावर फरी तलावाच्या विरुद्ध बाजूला असलेल्या झुडपी जंगलालगत असणाऱ्या स्वतःच्या शेतावर गवत काढायला गेली होती. यावेळी ही घटना घडली आहे.
ती गवत काढण्यात मग्न असताना अचानक वाघाने हल्ला करत तिला ठार केले. हल्ला होताच महानंदाने प्राणांतिक किंकाळी फोडली. किंकाळीचा आवाज ऐकताच आजूबाजूच्या शेतात असलेले शेतकरी आणि मजूर आवाजाच्या दिशेने धावले.
तेव्हा वाघ महानंदाचे शरीर ओढून नेत असल्याचे दिसून आले. लोकांनी मोठमोठ्याने आवाज करत धाव घेतली असता वाघ पळून गेला. मात्र तोपर्यंत महानंदाचा मृत्यू झाला होता.
यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. सध्या शेतातील निंदणी सुरू आहे. तसेच पाऊस पडल्याने पाणी लावण्यासाठी आणि इतर शेतातील कामे करण्यासाठी अनेक शेतकरी बांधव सकाळच्या सुमारास शेतात जातात. तसेच रात्रीची लाईट असल्यावर देखील अनेकजण पाणी लावायला रानात जातात.
या घटनेनंतर परिसरातील शेतकऱ्यांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मृतदेह ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे.
वन्यजीवांच्या हल्ल्यामध्ये नुकसानीची दीर्घकालीन भरपाई नियमांनुसार पिडीत परिवाराला देण्यात येणार असल्याचे वडसा वन विभागाचे विभागीय वनाधिकारी यांनी सांगितले आहे. या घटनेमुळे येथील शेतकरी सतर्क झाले आहे.