चोरापासून वाचण्यासाठी महिलेने लढवली भन्नाट शक्कल, म्हणाली, मला एड्स आहे; चोराने लगेचच..

शहरांमध्ये चोरी होणे ही सामान्य बाब होताना दिसत आहे. मुंबईत अनेकदा घर, दुकानं फोडून चोरी झाल्याच्या घटना समोर येत असतात. पण आता बोरिवलीतून एक विचित्रच घटना समोर आली आहे. एक चोर चोरी करण्यासाठी आला होता, पण चोरी न करताच तो तिथून पळून गेला आहे.

मुंबईच्या एका ५२ वर्षाच्या महिलेच्या घरात एक २५ वर्षांचा चोर आला होता. पण त्या चोरापासून बचाव करण्यासाठी तिने भलतीच शक्कल लढवली. आपल्याला एड्स आहे, असे तिने सांगितले. त्यामुळे घाबरलेल्या चोराने तिथून धुम ठोकली.

गोराई परिसरात ही घटना घडली आहे. या परिसरात एक महिला गेल्या ३० वर्षांपासून राहत आहे. त्यांचा मुलगा आणि सुन कामामुळे परदेशातच राहतात. तर त्या एका इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात काम करतात.

१४ ऑगस्टच्या मध्यरात्री त्यांच्या घरात एक चोर आला होता. तो चोरी करत असताना त्या महिलेला अचानक जाग आली. त्यावेळी एक २५ वर्षांचा मुलगा तोंडाला रुमाल बांधून चोरी करण्याचा प्रयत्न करत होता.

तु आत कसा शिरला? आणि तु आहे तरी कोण? असे प्रश्न ती महिला त्या चोराला विचारु लागली. तो म्हणाला की मी गर्दु्ल्ला आहे. मी चोरी करण्यासाठी इथे आलोय. महिलेला काही सुचायच्या आत त्याने तिच्यावर हल्ला केला.

धक्काबुक्की करत तो महिलेला मारणार करत होता. पण त्याला महिला घाबरली नाही आणि शक्कल लढवत आपल्याला एड्स असल्याचे तिने सांगितले. तितक्यात त्या महिलेला रक्ताची उलटी झाली. ते पाहून चोर प्रचंड घाबरुन गेला.

घाबरलेल्या चोराने घराला बाहेरुन कडी लावत त्याने तिथून पळ काढला. त्यानंतर त्या महिलेने शेजारच्यांना फोन लावून याबाबत माहिती दिली. त्यांनी येऊन घराची कडी उघडली. या घटनेबाबत महिलेने पोलिस तकार दाखल केली असून ते आता त्या चोराचा शोध घेत आहे.