जयपूर-मुंबई एक्सप्रेसमध्ये गोळीबाराची घटना घडली आहे. त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे. एका माथेफिरु कॉन्स्टेबलने चार जणांवर गोळीबार करत त्यांचा जीव घेतला आहे. त्यामध्ये एएसआय टीकाराम यांचाही मृत्यू झाला आहे.
पहाटे साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. चेतन सिंग नावाच्या एका कॉन्स्टेबलने हा गोळीबार केला आहे. या गोळीबारात एका पोलिस अधिकाऱ्याचा आणि तीन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला आहे. मानसिक तणावातून त्याने हा गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे.
एक्सप्रेसने पालघर ओलांडल्यानंतर हा गोळीबार झाला होता. त्यानंतर आरोपीने चेन खेचून रेल्वेतून खाली उडी मारत पळ काढला होता. पण पोलिसांनी त्याला अटक केली असून त्याची चौकशी केली जात आहे.
एएसआय टीकाराम मीणा यांना या घटनेत जीव गमवावा लागला आहे. ते मूळचे राजस्थानचे होते. आता त्यांच्या श्यामपूर गावचे सरपंच रामधन मीणा यांनी माहिती दिली आहे. महिन्याभरापूर्वीच टीकाराम ड्युटीवर गेले होते, असे त्यांनी सांगितले आहे.
चार पाच महिन्यानंतर ते निवृत्त होणार होते, त्यांनी याबाबत त्यांच्या वडिलांना सांगितले होते. पण त्यातच अशी घटना घडली आहे. त्यामुळे त्यांच्या वडिलांना मोठा धक्का बसला आहे. टीकारामच्या मृत्यूची बातमी कळताच त्यांचे अश्रू थांबत नव्हते, असेही रामधन मीणा यांनी सांगितले आहे.
टीकाराम यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी, आईवडिल असे पुर्ण कुटुंब आहे. त्यांच्या मुलाचं लग्नही ठरलं होतं. तोही स्पर्धा परीक्षांची तयारी करत होता. तर मुलीचं लग्न झालेलं आहे. टीकाराम यांच्या मृत्यूनंतर पश्चिम रेल्वेने त्यांना सुरक्षा निधी, सेनानिवृत्ती आणि विमा योजनेअंतर्गत एकूण ३१ लाखांची मदत जाहीर केली आहे.