उद्धव ठाकरे यांच्या गटाला गेल्या एक महिन्यात मोठे धक्के बसले आहे. मनिषा कायंदे, नीलम गोऱ्हे अशा बड्या महिला नेत्या शिंदे गटात सामील झाल्या आहे. असे असताना आता पुन्हा एकदा ठाकरेंना एक मोठा धक्का मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिला आहे.
मुंबई महापालिकेतील एका बड्या महिला नेत्याने एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबतच काही नगरसेवकांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. सातवेळा नगरसेविका म्हणून निवडून आलेल्या तृष्णा विश्वासराव यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
तृष्णा विश्वासराव यांच्या जाण्याने ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे. एकनाथ शिंदेंची काम करण्याची पद्धत आवडल्याने आपण शिवसेनेत प्रवेश करत असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे.
आमदार सदा सरवणकर, मनिषा कायंदे, संजय म्हशीलकर, नरेश म्हस्के, परमेश्वर कदम, शीतल म्हात्रे हे नेतेही या पक्षप्रवेशावेळी उपस्थित होते. यावेळी एकनाथ शिंदे यांनी तृष्णा विश्वासराव यांचे पक्षात स्वागत केले आहेत, तसेच त्यांच्या कामगिरीचे कौतूकही केले आहेत.
मुंबई शहरामध्ये मोजक्या लोकांचे नाव सगळेजण अभिमानाने घेत असतात. त्यामध्ये तृष्णा ताई यांचे नावही आहे. त्यांनी आज बाळाासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे या पक्षामध्ये स्वागत आहे. त्या सातवेळा नगरसेविका झाल्या आहेत. त्यांनी विभागप्रमुख, संपर्कप्रमुखाची जबाबदारीही पार पाडली आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.
तसेच आम्ही एक वर्षापूर्वी धाडसी निर्णय घेतला होता. त्याला हजारो, लाखो लोकांनी पाठिंबा दिला होता. सरकार हे जनतेला न्याय देण्यासाठी असते. त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवणारे सरकार म्हणून आम्ही काम करतोय. त्यामुळे प्रत्येक जिल्ह्यातील, तालुक्यातील नेते या पक्षात प्रवेश करत आम्हाला पाठिंबा देत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे.