Hingoli News: हिंगोली शहरातील बनसोंड भागात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ५ जानेवारी रोजी एका घरावर छापा टाकून तब्बल २० किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हिंगोली जिल्ह्यात वाटमारी आणि गुन्हेगारी रोखण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे पथके रात्र गस्तीसाठी तयार करण्यात आले आहेत. यावेळी बळसोंड भागातील एका घरात गांजाची साठवण करून ठेवल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार, पथकाने परसराम मस्के यांच्या घरी जाऊन छापा टाकला.
छाप्यात परसराम मस्के आणि रवी पोले या दोघांनी मिळून एका नायलोनच्या पोत्यात गांजाची साठवण केल्याचे आढळून आले. घरातील सर्व परिसर पोलिसांनी पिंजून काढला. यामध्ये तब्बल २० किलो ६०० ग्रॅम गांजा, एक मोटरसायकल आणि मोबाईल असा ४ लाख ७२ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला.
शासनाने प्रतिबंधित केलेला गांजा लागवड आणि विक्री विरुद्ध प्रभावी कार्यवाही करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत. त्यानुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या आदेशावरून सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे यांच्या पथकाने दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले.
या प्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, या दोन्ही आरोपींचा पूर्वीही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचे समोर आले आहे.
या कारवाईमुळे शहरातील गांजा तस्करीला आळा बसण्यास मदत होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी सदरची कारवाई पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, पोलीस अंमलदार गजानन पोकळे, पारू कुडमेथा, राजु ठाकुर, नितीन गोरे, नरेंद्र साळवे, आकाश टापरे, आजम प्यारेवाले, प्रशांत वाघमारे यांनी केली आहे.