जिवलग मित्राने आत्महत्या केली म्हणून दोघे बघायला गेले, अन् वाटेत नको तेच घडलं, घटनेने हळहळ

मुक्ताईनगर गावाजवळ दुपारी एक विचित्र अपघात झाला आहे. आपल्या मित्राने आत्महत्या केली म्हणून रुग्णालयात त्याला भेटून पुन्हा गावाकडे परतत असलेल्या तरुणांच्या दुचाकीला कारने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरील दोन्ही तरुण जागीच ठार झाले.

तसेच कारला मागून येणाऱ्या दुसऱ्या दुचाकीने धडक दिल्याने एकूण चार जण जखमी झाले आहेत. याबाबत माहिती अशी की, पूर्णाड येथील दीपक अशोक इंगळे या तरुणाने आत्महत्या केल्याची घटना घडली. त्यानंतर दीपकचा मृतदेह उपजिल्हा रुग्णालय, मुक्ताईनगर येथे आणण्यात आला होता.

याबाबत त्याच्या मित्रांना माहिती मिळाली. त्याला बघण्यासाठी दीपकच्या पूर्णाड गावातील रोहित गाढे आणि प्रदीप वाघ हे दोघेही दुचाकीने मंगळवारी दुचाकीने मुक्ताईनगर उपजिल्हा रुग्णालयात आले होते. नंतर पुन्हा ते घराकडे निघाले.

असे असताना मात्र त्यांचे मृतदेह पुन्हा त्याच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याची दुर्दैवी वेळ आली आहे. रोहित मुकेश गाढे (वय १९, रा. पूर्णाड ता. मुक्ताईनगर) आणि प्रदीप छगन वाघ (वय २८, रा. पूर्णाड ता. मुक्ताईनगर) अशी मृत तरुणांची नावे आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी तात्काळ उपजिल्हा रुग्णालय धाव घेतली. जखमींना प्रथमोपचार करून तात्काळ जळगाव जिल्हा रुग्णालय येथे पुढील उपचारासाठी रवाना केले.