नांदेड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील बिलोली तालुक्यातील बामणी गावात एका पाझर तलावात बुडून ३ शाळकरी मुलांचा मृत्यू झाला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबत तपास सुरू आहे.
मृतांमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. तसेच नांदेडमध्ये गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाचा गोदावरी नदीत बुडून मृत्यू झाला. बामणी गावात राहणारे देवानंद, बालाजी आणि वैभव हे तीनही शाळकरी मुले गुरुवारी पोहण्यासाठी पाझर तलावाकडे गेले होते.
असे असताना पाण्याचा अंदाज न आल्याने तिघेही बुडाल्याने त्यांचा दुर्देवी मृत्यू झाला. घटनेनंतर गावकऱ्यांनी तलावाच्या दिशेने धाव घेतली. शोधाशोध घेतल्यानंतर तिन्ही मुलांचे मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आले.
दरम्यान, गणेश विसर्जनाच्या धामधुमीत गावातील तीन शाळकरी मुलांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याने बामणी गावावर शोककळा पसरली आहे. देवानंद व बालाजी हे दोघे सख्खे भाऊ आहेत. तर वैभव हा आई वडिलांना एकटाच होता.
यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, मुले पाण्यात बुडाल्याची घटना गावात वाऱ्यासारखी पसरली. देवानंद पिराजी गायकवाड (वय १५ वर्ष), बालाजी पिराजी गायकवाड (वय १२ वर्ष) व वैभव पंढरी दुधारे (वय १५ वर्ष, सर्व रा. बामणी) असे मृतांची नावे आहेत.