राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने गुरुवारी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी एक मेसेज केला होता. सकाळी फोन अचानक व्हायब्रेट झाल्यामुळे अनेकांना काही कळत नव्हते. फोन जोरात व्हायब्रेट होत होता. नेमका तो आवाज कशाचा होता ही सुरुवातीला कळतच नव्हते.
आपला मोबाईल हॅक झालाय की काय असा प्रश्नही अनेकांना पडला होता. तसेच आपला डेटा चोरीला तर नाही ना गेला? असाही प्रश्न काहींना पडला होता. त्यानंतर या मेसेजबाबत चिंता करण्यासारखे काहीही नसल्याचे अखेर समोर आले.
राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने हा मेसेज टेलिकॉम कंपन्यांच्या मार्फत पाठवला होता. विशिष्ट भौगोलिक परिसरात किंवा देशभरात एकाचवेळी सर्व मोबाईल नंबरवर हे आपत्कालीन सुचना पाठविण्याची क्षमता या विभागाकडे आहे.
भुकंप, मुसळधार पाऊस, पूरपरिस्थितीत सूचना देण्यात यावी यासाठी ही चाचणी केली जात आहे. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन विभागाने याबाबत त्यांच्या पोर्टलवर माहिती दिली आहे. राज्यातील परिस्थिती भितीदायक आहे. मुसळधार पाऊस येत आहे. त्यामुळे चाचणीसाठी इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषेत हा मेसेज ग्राहकांना पाठवण्यात आला होता.
अशात अनेकांच्या मोबाईलवर हा अलर्ट आला नाही, त्यामुळे आपला मोबाईल का वाजला नाही? असाही प्रश्न अनेकांना पडला आहे. त्यामागचे कारण असे की ज्या मोबाईलमध्ये अलर्टची सेटींग बंद होती, त्यांच्या मोबाईलमध्ये हा अलर्ट वाजला नाही.
काही हँडसेटमध्ये अलर्टची सेटींग आधीपासून सुरु असते. तर काहींच्या फोनमध्ये ती आधीपासून सुरु नसते. त्यामुळे असा काही मेसेज आला तरी त्यांचा फोन वाजत नाही. गुरुवारी मेसेज आला तेव्हा आयफोनमध्ये हा अलर्ट वाजला नाही. जर आपत्कालीन अलर्ट हवे असतील तर सेटींगमध्ये जाऊन अलर्ट सेटींग ऑन करावी लागते.