पशुपतिनाथहून निघाले इतक्यात…!! जळगावच्या २७ भाविकांना गिळणाऱ्या अपघाताचा थरार आला समोर

महाराष्ट्रातील ४० पर्यटकांसह निघालेली प्रवासी बस नदीपात्रात कोसळून नेपाळमध्ये भीषण दुर्घटना घडली आहे. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातात राज्यातील 27 प्रवाशांना प्राण गमवावे लागले आहेत. या अपघाताची चौकशी केली जात आहे.

या बसमध्ये 40 प्रवासी होते. १३ जणांना वाचविण्यात यश आले आहे. हे सर्व भाविक भुसावळचे आहे. यामध्ये अनेकजण जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. नदीपात्रात बस कोसळल्यामुळे बचावकार्य आव्हानात्मक झाले आहे. अयोध्येतील रामकथा श्रवण करण्यासह प्रयागराज येथे गेले होते.

नंतर सगळे गोरखपूरच्या केसरवाणी टूर अँड ट्रॅव्हल्स एजन्सीच्या दोन बसने नेपाळला गेले. दोन दिवसांपूर्वीच ते नेपाळमध्ये दाखल झाले होते. २२ ऑगस्ट रोजी दोन बस पोखरा येथे पोहोचल्या. शुक्रवारी भाविकांनी पशुपतिनाथ येथे दर्शन घेतल्यानंतर सर्व जण पोखराहून काठमांडूला जाण्यासाठी निघाले.

असे असताना एैना धबधब्या जवळ एका बसचालकाचे नियंत्रण सुटले व महामार्गावरून बस ५०० फुटांवरून खोल नदीत कोसळली, यामुळे हा अपघात झाला. हे सर्व जण भुसावळ तालुक्यातील वरणगाव, सुसरी, पिंपळगाव खुर्द, गोळेगाव, तळवेल, आचेगाव या गावचे रहिवासी आहेत.

सध्या जखमींवर उपचार सुरू आहेत. तसेच मृतांना राज्यात आणणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. दरम्यान, अपघातातील १२ जखमींची प्रकृती चिंताजनक असून, त्यांना उपचारासाठी हवाईमार्गे काठमांडूला हलवण्यात आले आहे.

गेल्या महिन्यात नेपाळमधील त्रिशूली नदीत ६५ प्रवाशांसह दोन बस भूस्खलनामुळे वाहून गेल्या होत्या. आता देखील याठिकाणी ही घटना घडली आहे. सध्या महाराष्ट्र शासन नेपाळमधील भारतीय दूतावासाच्या संपर्कात असून माहिती घेत आहे. या घटनेवर सध्या दुःख व्यक्त केले जात आहे.