आपले स्वत:चे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. त्यामुळे अनेक लोक हे कर्ज काढून घर बनवतात किंवा विकत घेत असतात. त्यानंतर ते कर्ज तो हळूहळू पैसे भरुन फेडत असतो. तसेच कर्जासोबत त्याला व्याजही द्यावे लागते.
अशात कर्ज घेणाऱ्याचा कर्ज भरत असतानाच मृत्यू झाला तर त्याच्या कर्जाचे काय होते? त्याचे कर्ज कोण भरते? असे अनेक प्रश्न लोकांना पडत असतात. आता त्याच प्रश्नांची उत्तर आपण या बातमीमध्ये जाणून घेणार आहोत.
जेव्हा एखादा व्यक्ती कर्ज घेत असतो, तेव्हा बँक त्याच्याकडून काही ना काही तारण ठेवते. त्यामध्ये त्या व्यक्तीची मालमत्ता असते. कर्जदाराला कर्ज भरणे शक्य झाले नाही किंवा कर्ज भरण्याआधीच त्याचा मृत्यू झाला तर ती मालमत्ता बँक जप्त करते.
कर्जादाराचा जर मृत्यू झाला तर त्याचे कर्ज त्याचा वारसदार फेडतो असे म्हटले जाते. पण प्रत्येक कर्जाला तसे नियम लागू होत नाही. प्रत्येक कर्जाचे वेगवेगळे नियम असतात. वैयक्तिक कर्ज, गृह कर्ज आणि कार कर्ज असे कर्जाचे तीन प्रकार आहे.
कार कर्ज घेतले असेल आणि कर्जदाराचा मृत्यू झाला असेल तर बँक आधी त्या व्यक्तीच्या कुटुंबातील लोकांशी संपर्क साधते. पण त्यांनी कोणी बाकी असलेली रक्कम न भरल्यास ती कार बँकेद्वारे जप्त केली जाते.
तसेच जर गृह कर्ज दोन व्यक्तींनी मिळून घेतले असेल आणि एका व्यक्तीचा मृत्यू झाला असेल तर दुसरा व्यक्ती ते कर्ज भरतो. पण जर एकानेच गृहकर्ज घेतले असेल तर त्याच्या वारसदारांकडून त्या कर्जाची रक्कम वसूल केली जाते. पर्सनल लोनवेळी बँक ही इन्शुरन्स काढत असते. त्यामुळे पैसे मिळाले नाही तर त्यातून ते पैसे वसूल केले जातात.