काळ आला होता पण वेळ नाही या म्हणीबाबत तुम्ही ऐकलंच असेल. अनेकदा लोकांवर असे संकट येते की त्याच्यातून ते वाचणार नाही, असेच वाटते. पण ते त्यातून वाचतात. अशीच एक घटना आता पुण्यातील दौंडमध्ये पाहायला मिळाली आहे.
एका शेतकऱ्याच्या अंगावर बिबट्याने हल्ला केला होता. पण त्याच्या पत्नीने मोठ्या शिताफिने बिबट्याच्या तावडीतून पतीची सुटका केली आहे. तिने दाखवलेल्या धैर्यामुळे तिच्या पतीचा जीव वाचला आहे.
दौंडच्या नानगावामध्ये ही घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्लात काशिनाथ निंबाळकर हे गंभीर जखमी झाले आहे. पण पत्नीमुळे त्यांचा जीव वाचला आहे.पतीचा जीव वाचवल्यामुळे सगळीकडे त्या महिलेचे कौतूक होत आहे.
काशिनाथ निंबाळकर यांच्या घराभोवती ऊस आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास ते घराच्या मागेच्या बाजूस गेले होते. ते घरामागे गेले असताना त्यांच्यावर बिबट्याने हल्ला केला होता. बिबट्याने काशिनाथ यांच्या हनवटीला पकडले होते.
हल्ला झाल्यामुळे ते मोठ्याने ओरडू लागले. त्यांचा हा आवाज घरात असलेल्या त्यांच्या पत्नी सरुबाई यांनी ऐकला. त्यामुळे त्या घराच्या पाठीमागे धावल्या. त्यावेळी त्यांचा कुत्राही त्यांच्यासोबत घराच्या पाठीागे धावला.
कुत्र्याने थेट बिबट्यावर झडप मारली. त्यानंतर सरुबाई यांनी लगेचच बिबट्यावर काठीने हल्ला केला. अशात कुत्र्याने आणि काठीने अचानक हल्ला झाल्यामुळे बिबट्या घाबरला. त्यामुळे त्याने शेतात पळ काढला. या घटनेत काशिनाथ जखमी झाले असले तरी त्यांच्या पत्नी आणि कुत्र्यामुळे त्यांचा जीव वाचला आहे.
काशिनाथ यांच्या हनवटीला सहा टाके पडले आहे. तसेच त्यांच्या हातालाही जखमा झाल्या आहेत. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. नदीकाठचा परिसर असल्यामुळे याठिकाणी अनेक बिबटे दिसून येत असतात.
बिबट्याचा हल्ला पाहून अंगाचा थरकाप उडाला होता. पण पतीवर त्याने हल्ला केला होता. त्यामुळे त्यांचा जीव वाचवणे गरजेचे होते. त्यामुळे मी मागे हटले नाही. त्याच्यावर काठीने हल्ला केला. त्यावेळी कुत्र्यानेही हल्ला केल्यामुळे तो पळून गेला, असे सरुबाई यांनी म्हटले आहे.