बिहारच्या गोपालगंजमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. लग्नाच्या ४ महिन्यानंतरच एका डॉक्टरच्या पत्नीचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यू संशयास्पद असल्याचे सांगितले जात आहे. तर तरुणीच्या नातेवाईकांनी तरुणीच्या सासरच्या लोकांवर खुनाचे आरोप केले आहे.
नातेवाईकांनी तरुणीच्या सासरच्या घरासमोरच तिचे अंत्यसंस्कार केले आहे. संबंधित घटना ही आलापूर गावातील आहे. मंगळवारी त्या तरुणीचा संंशयास्पद मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर आईवडिल तिच्या सासरी आले तेव्हा त्यांनी तिच्या सासरच्यांवर गंभीर आरोप केले आहे.
बुधवारी नवविवाहितेचा अंत्यसंस्कार तिच्या सासरच्या घरासमोरच करण्यात आला आहे. याप्रकरणी त्यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी कारवाई करत डॉक्टर नवऱ्याला ताब्यात घेतलं असून त्याची चौकशी केली जात आहे.
निशा कुमारी असे त्या मृत तरुणीचे नाव आहे. २८ फेब्रुवारीला तिचे मुकेश कुमार नावाच्या तरुणासोबत लग्न झाले होते. ज्यादिवशी तिचा मृत्यू झाला त्याचदिवशी ते हनिमुनसाठी लखनऊला जाणार होते. त्यांनी रेल्वेची तिकीटंही काढली होती. बॅगही पॅक केली होती. मुकेश वरच्या खोलीत तिला बोलण्यासाठी गेला तेव्हा तिने जीव दिल्याचे समोर आले होते.
आईवडिलांना याप्रकरणाची माहिती मिळताच त्यांनी पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आहे. त्यानंतर त्यांनी सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी सासू-सासरे, पती यांच्यासह सात जणांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
निशाच्या पतीचे कोणत्यातरी महिलेशी संबंध होते. ते तिला कळल्यामुळे तो तिला त्रास देत होता. तो हुंड्यासाठीही तिला आणि आमच्या कुटुंबाला त्रास देत होता. १८ जूलैला गळा दाबून तिचा जीव घेण्यात आला आहे, असा गंभीर आरोप तिच्या कुटुंबाने पती मुकेश आणि त्याच्या कुटुंबावर केला आहे.