हॉटेलमध्ये काम केले, जमीनही विकली, सरकारला घाम फोडणारे मनोज जरांगे आहेत तरी कोण? वाचा..

जालना जिल्ह्यातून सुरू झालेल्या मराठा आंदोलनातील केंद्रस्थानी असणारे मनोज जरांगे यांची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मराठ्यांना जोपर्यंत आरक्षण मिळणार नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही. असे म्हणत त्यांनी सरकारला घाम फोडला आहे. मनोज जरांगे पाटील नक्की कोण हे अजूनही अनेकांना माहिती नाही.

ते मूळचे बीड जिल्ह्यातील. गेवराई तालुक्यातील माथोरी हे त्यांचे मूळ गाव. शहागड ही त्यांची सासुरवाडी. गेल्या अनेक वर्षापासून ते शहागडमध्ये राहतात. अनेकांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते पहिल्यापासूनच तयार असतात.

माथोरी गावातील ते एक अल्पभूधारक शेतकरी आहेत. बारावीपर्यंत शिकलेल्या जरांगे यांनी विविध आंदोलने केली. अगदी गेल्या काही महिन्यात अनेक गावात उपोषण केले. त्यांच्या आंदोलनाला किंवा उपोषणाला मोठी गर्दी होत असते.

गावातील लोक त्यांच्या आंदोलनात सहभागी होते. मनोज जरांगे पाटील यांनी शिवबा ही संघटनाही स्थापन केली. जरांगे हे शहागडच्या मध्ये एका छोट्या घरात राहतात. अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथेही त्यांनी उपोषण केले होते.

या आंदोलनाचीही चर्चा झाली होती.तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना चर्चेसाठी मुंबईत बोलवले होते. ते पूर्णवेळ मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी काम करतात. अनेकांचे प्रश्न त्यांनी सोडवले आहेत.

दरम्यान, मराठा आरक्षणासाठी आर्थिक रसद मिळावी म्हणून त्यांनी स्वतःच्या मालकीची जमिनही विकली आहे. त्यांनी मोठा संघर्ष केला आहे. त्यांनी हॉटेलमध्ये देखील काम केले आहे. सध्या त्यांचे आंदोलन सुरूच आहे. यामुळे सरकार काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल.