Yavatmal news : उमरखेड (यवतमाळ) येथून एक दुःखद बातमी समोर आली आहे. याठिकाणी साखरा या गावात लेकीच्या जाण्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. या गावातील लेक लग्नानंतर केवळ सासरी नव्हे, तर जगातूनच कायमची निघून गेली. यामुळे गावावर दुःखाचा डोंगर पसरला आहे.
याठिकाणी लग्नाच्या अवघ्या तिसऱ्या दिवशी वाहन अपघातात नव्या नवरीसह पाच जणांचा मृत्यू झाला. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे संपूर्ण साखरा गावात सामसूम असून गावात एकाही घरी चूल पेटली नाही.
याबाबत माहिती अशी की, नववधू व नवरदेव यांना घेऊन सर्वजण वाहनाने साखरा गावाकडे येत होते. मात्र सोमठाणा शिवारात चटलावार यांच्या ढाब्यासमोर त्यांच्या वाहनाला अपघात झाला. यामध्ये काहींचा जागेवरच मृत्यू झाला आहे.
नांदेडकडे विटा घेऊन निघालेल्या वाहनाने त्यांच्या कारला धडक दिली. ज्ञानेश्वर पामलवाड यांची मुलगी पूजा हिचा विवाह जारीकोट ता. धर्माबाद, जि. नांदेड येथील नागेश साहेबराव कन्हेवाड यांच्याशी झाला होता. लग्नानंतर नवरी-नवरदेव आपल्या गावाकडे परत गेले.
असे असताना नववधूला मांडव परतणीसाठी पुन्हा माहेरी आणण्यासाठी माहेरकडील मंडळी गेली होती. यावेळी हा अपघात झाला आहे. यामध्ये पूजा ज्ञानेश्वर पामलवाड ही नववधू, दत्ता ज्ञानेश्वर पामलवाड हा तिचा सख्खा भाऊ, तसेच संतोष परमेश्वर पामलवाड हा चुलत भाऊ हे जागीच ठार झाले.
तसेच गाडी चालक सुनील दिगांबर यांचेही निधन झाले आहे. तीनही बहीण- भावांच्या मृतदेहांंना साखरा गावात एकाच चितेवर अग्नी देण्यात आला. यावेळी साखरा गावासह संपूर्ण पंचक्रोशीतील गावकरी उपस्थित होते. यावेळी सगळीकडे शोककळा पसरली होती.