2 वर्षांपूर्वी नितीन देसाईंवर प्रचंड मोठं संकट कोसळलेलं, लाखोंचं नुकसान; वाचा नेमकं काय घडलं होतं?

कलादिग्दर्शक नितीन देसाई यांच्या निधनामुळे सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांनी त्यांच्याच स्टुडिओमध्ये आपले जीवन संपवले आहे. वयाच्या ५८ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. २४९ कोटींचे कर्ज असल्यामुळे त्यांनी असा निर्णय घेतल्याचे समोर आले आहे.

देवदास, जोधा अकबर, हम दिल दे चुके सनम अशा अनेक चित्रपटांचे सेट त्यांनी उभारले होते. त्यांच्या भव्यदिव्य सेट्सची नेहमीच चर्चा असायची. ऐतिहासिक चित्रपट असो वा मालिका नितीन देसाई यांनीच सेट उभारावा अशी प्रत्येकाची इच्छा असायची.

चित्रपटच नाही, तर देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, मनोहर जोशी यांच्या कार्यक्रमांच्या सेटची उभारणी सुद्धा नितीन देसाई यांनी केली होती. तसेच नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर मुंबईत त्यांचा सत्कार झाला होता. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमाचा सेटही नितीन देसाई यांनी उभारला होता.

कर्जतच्या ५२ एकर जमिनीमध्ये नितीन देसाई यांनी स्टुडिओ उभारला होता. पण ७ मार्च २०२१ मध्ये या स्टुडिओमध्ये आग लागली होती. या आगीमध्ये स्टुडिओचं मोठं नुकसान झालं होतं. प्लायवूड, पीओपी अशा अनेक गोष्टी त्यात खाक झाल्या होत्या.

आसपासच्या परीसरातही ही आग पसरली होती. एनडी स्टुडिओच्या मागच्या बाजूला पनवेल कर्जत रेल्वे लाईन आहे. त्या परिसरात साफसफाई सुरु होती. त्यामुळे रेल्वे विभागाने तेथील गवत पेटवलं होतं. पण ती आग देसाईंच्या स्टुडिओपर्यंत पोहचली होती.

प्लायवूड, पीओपीचे सेट्स असल्यामुळे आगीने लवकर पेट घेतला. त्यामुळे ती आग प्रचंड वाढली. त्यामध्ये नितीन देसाईंच्या स्टुडिओचे मोठे नुकसान झाले. त्या आगीत नितीन देसाईंचे २० ते ३० लाख रुपयांचे नुकसान झाले होते.