लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न, 2 सख्ख्या बहि‍णींना ड्रममध्ये बुडवून मारलं; पुण्यातील भयंकर प्रकार

पुण्यातील राजगुरुनगर येथे दोन अल्पवयीन मुलींच्या हत्येने संपूर्ण परिसर हादरला आहे. 54 वर्षीय अजय चंद्रमोहन दास या आरोपीने लैंगिक शोषण उघड होण्याच्या भीतीने दोन्ही बहिणींना पाण्याच्या ड्रममध्ये बुडवून निर्घृण हत्या केली. मुलींचे मृतदेह आरोपीच्या घरातून सापडल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

आरोपीचा परराज्यात पळून जाण्याचा प्रयत्न फसला
हत्या केल्यानंतर आरोपीने परराज्यात पळून जाण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी त्याला तत्काळ अटक केली. अजय दासवर गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी फास्ट ट्रॅक न्यायालयात या खटल्याची सुनावणी होईल आणि आरोपीला फाशीची शिक्षा मिळावी यासाठी पाठपुरावा केला जाईल, असे स्पष्ट केले आहे.

पीडित कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी आंदोलन आणि उपाययोजना
या घटनेच्या निषेधार्थ राजगुरुनगर पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन करण्यात आले. आंदोलकांच्या मागण्या मान्य झाल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. सातकरस्थळ ग्रामपंचायतीने पीडित कुटुंबाला घर, नोकरी, आणि मुलांच्या शिक्षणासाठी पालकत्व स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे.

राजकीय आणि सामाजिक प्रतिक्रिया
विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिस तपासाचा आढावा घेतला आणि पीडित कुटुंबाला सांत्वनपर भेट दिली. त्यांनी राज्य सरकारकडून कठोर उपाययोजना राबवण्याची मागणी केली आहे. “मुलींच्या सुरक्षेसाठी परप्रांतीय भाडेकरूंच्या नोंदी ठेवणे आणि त्यांची पार्श्वभूमी तपासणे आवश्यक आहे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.

न्यायव्यवस्थेत सुधारणा आवश्यक
गोऱ्हेंनी फास्ट ट्रॅक कोर्टातील खटल्यांना जलदगतीने निकाली लावण्याची मागणी केली आहे. “न्यायालयाच्या कार्यप्रणालीत सुधारणा करणे गरजेचे असून, प्रलंबित प्रकरणे निकाली लावण्यासाठी न्यायालय दोन शिफ्टमध्ये काम करावे,” असे त्यांनी सुचवले.

संपूर्ण समाज हादरला
या क्रूर घटनेने मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नराधमाला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी समाजातून होत आहे. ही घटना अन्यायाला वाचा फोडणारी असून, आरोपीला फाशीची शिक्षा देऊन पीडित कुटुंबाला न्याय मिळावा, असे जनमत आहे.