Bhopal : हॉस्टेलमधून 26 मुली गायब झाल्यानं उडाली खळबळ, धर्मांतर कनेक्शन? वाचा काय आहे संपूर्ण प्रकरण..

Bhopal : राजधानी भोपाळमध्ये असलेल्या एनजीओच्या वसतिगृहातून २६ मुली बेपत्ता झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी परवालिया पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे, तर राष्ट्रीय बाल आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली आहे. राष्ट्रीय बाल आयोगाने या प्रकरणी सीएसला पत्र लिहिले आहे.

झालं असं की, हॉस्टेलमध्ये एकूण ६८ मुली होत्या. त्यापैकी २६ मुली बेपत्ता झाल्याची माहिती शनिवारी समोर आली. मुली बेपत्ता झाल्याची माहिती मिळताच संपूर्ण प्रशासन सक्रिय झाले आणि तपास सुरू करण्यात आला.

आता या प्रकरणी हॉस्टेलच्या संचालकांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तसेच, प्रकल्प अधिकाऱ्यांसह इतर दोघांना बेजबाबदारपणाच्या आरोपावरून निलंबित करण्यात आले आहे.

तारा सेवानिया भागातील चिल्ड्रन होम परवानगीशिवाय चालवले जात आहे. वसतिगृहात राहणाऱ्या ६८ मुलींच्या प्रवेशिका आहेत, तर येथे केवळ ४१ मुली आढळल्या. या वसतिगृहात सीहोर, रायसेन, छिंदवाडा, मध्य प्रदेशातील बालाघाट याशिवाय गुजरात, झारखंड आणि राजस्थानमधील मुली राहतात.

राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली आहे. त्या मुली सापडल्या आहेत. मुलींना त्यांच्या आई वडिलांच्या ताब्यात देण्यात आल्याचं हॉस्टेल संचालकांनी सांगितले आहे. पण यासंबंधित कोणताही दस्तऐवज त्यांनी सादर केला नाही.

त्या मुलांना हॉस्टेलमध्ये ख्रिश्चन धर्माचे नियम पाळायला लावले जात असल्याचे सांगण्यात येत आहे. या मुलांचे वय ६ ते १८ वर्षांच्या दरम्यान आहे, त्यापैकी बहुतांश ४० पेक्षा जास्त मुली हिंदू आहेत. संस्थेला जर्मनीतून निधी मिळत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

दरम्यान, या प्रकरणावरून राजकारणही तापलं आहे. माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण यांनी सरकारनं सर्वात आधी या प्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.