मृत्यूचे तांडव! जिल्हा परीषद सदस्यासह ६ जणांची हत्या; एकाचा बदला घेण्यासाठी ५ जणांना संपवलं

उत्तर प्रदेशातील देवरिया जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील रुद्रपूर कोतवाली परिसरात सोमवारी सकाळी झालेल्या रक्तरंजित हाणामारीत सहा जण ठार झाले. जमिनीच्या वादातून ही घटना घडली आहे.

मृतांमध्ये एकाच कुटुंबातील पाच जणांचा समावेश आहे तर दुसऱ्या कुटुंबातील माजी जिल्हा पंचायत सदस्याचा खून करण्यात आला आहे. या घटनेनंतर गावात तणावाचे वातावरण पाहता सुमारे दोन डझन ठाण्यांतील पोलीस आणि पीएसी तैनात करण्यात आले आहे.

आयुक्त व महानिरीक्षकांनी घटनास्थळी पोहोचून आढावा घेतला. या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

फतेहपूरच्या लेधा टोला येथील रहिवासी सत्य प्रकाश दुबे यांचा धाकटा भाऊ साधू दुबे याने 2014 मध्ये गावातील अभयपुरा टोला येथील माजी जिल्हा पंचायत सदस्य प्रेमचंद यादव यांना सुमारे 10 बिघा जमीन विकली होती.

या प्रकरणावरून सत्यप्रकाश दुबे आणि प्रेमचंद यादव यांच्या कुटुंबीयांमध्ये वाद सुरू होता. सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रेमचंद यादव हे बाईकवरून शेत पाहण्यासाठी गेले होते. यानंतर ते सत्यप्रकाश दुबे यांच्या घरी पोहोचले.

येथे त्याचा सत्यप्रकाश दुबे यांच्या कुटुंबीयांशी वाद सुरू झाला. त्यादरम्यान वाद वाढत गेला आणि सत्यप्रकाश दुबे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रेमचंद यादव यांचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून केला. या घटनेची माहिती प्रेमचंद यादव यांच्या कुटुंबीयांना आणि त्यांच्या वस्तीत राहणाऱ्या लोकांना समजताच ते संतप्त झाले.

तेथून डझनभरांचा जमाव काठ्या आणि शस्त्रांसह सत्यप्रकाश दुबे यांच्या घरी पोहोचला आणि त्यांच्यावर हल्ला केला. संतप्त झालेल्या लोकांनी सत्यप्रकाश यांच्या घराचा दरवाजा तोडून आत घुसून सत्यप्रकाश दुबे आणि त्यांच्या कुटुंबीयांना बेदम मारहाण केली आणि त्यांचा गळा चिरला.

या घटनेत सत्यप्रकाश दुबे, त्यांची पत्नी, दोन मुली आणि एका मुलाचा जागीच मृत्यू झाला तर आठ वर्षांच्या मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना गोरखपूरच्या बीआरडी मेडिकल कॉलेजमध्ये पाठवण्यात आले आहे.

फतेहपूरमध्ये 6 जणांची हत्या झाल्याची माहिती मिळताच प्रशासकीय कर्मचाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. काही तासांतच आयुक्त अनिल धिंग्रा आणि गोरखपूरचे आयजी रविंदर गौर घटनास्थळी पोहोचले. अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी करून कारवाईच्या सूचना दिल्या.

या घटनेनंतर जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांव्यतिरिक्त गोरखपूरच्या चौरीचौरा आणि झांघा पोलीस ठाण्यांतील पोलिसांनाही फतेहपूरला पाचारण करण्यात आले. याशिवाय फतेहपूर चौकापासून गावापर्यंत पीएसीही तैनात करण्यात आली आहे.

पोलिस लाईन्समधूनही मोठ्या प्रमाणात फौजफाटा पाठवण्यात आला आहे. डीएम अखंड प्रताप सिंह आणि एसपी संकल्प शर्मा स्वतः गावात तळ ठोकून आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केले आहे.

मुख्यमंत्र्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त केला आहे. जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. यासोबतच जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या. त्यांनी जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून पीडित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याच्या सूचना दिल्या.

यासह, आयुक्त/आयजी यांना या प्रकरणातील दोषींवर त्वरित आणि कठोर कारवाई करण्यास सांगितले आहे. देवरियाचे जिल्हा दंडाधिकारी अखंड प्रताप सिंह यांनी सांगितले की, जमिनीच्या वादातून 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

या घटनेमागे जमिनीचा वाद आहे, मात्र जमिनीच्या वादाशी संबंधित सर्व प्रकरणे निकाली काढण्यात आली. असे असतानाही दोन्ही बाजूंमध्ये खडाजंगी सुरू होती. सकाळी प्रेम यादव हे सत्यप्रकाश दुबे यांच्या घरी आले होते. त्यात बाचाबाची झाली.

सत्यप्रकाश दुबे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी प्रेम यादव यांची धारदार शस्त्राने हत्या केली. काही वेळानंतर अभयपूर येथील प्रेम यादव वस्तीतील लोकांनी सत्यप्रकाश दुबे यांच्या घरावर हल्ला करून ही घटना घडवून आणली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे.