दया दाखवू नका, त्याला फाशी द्या! वरळी अपघातात मराठी अभिनेत्याने गमावली सर्वात जवळची व्यक्ती…

काही दिवसांपूर्वी पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण ताजे असताना मुंबईत तशीच एक धक्कादायक घटना घडली. यामुळे एकच खळबळ उडाली. वरळीमध्ये हिट अँड रनची घटना घडली.या प्रकरणातील आरोपी मिहीर शहाचे वडील शिवसेना शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा हे आहेत. यामुळे वातावरण तापले आहे.

वरळीत भरधाव वेगाने आलेल्या बीएमडब्ल्यू कारने एका दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरुन नाखवा दाम्पत्य प्रवास करत होते. ते मासे विकत घेऊन घरी परतत असताना BMW ने त्यांना जोरदार धडक दिली. या अपघातात पत्नी कावेरी यांचा मृत्यू झाला. तर प्रदीप नाखवा बचावले.

आरोपीने त्यांना जवळपास २ किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. यामुळे घटना किती गंभीर आहे, याचा अंदाज येतो. आता या प्रकरणात अजून माहिती समोर आली आहे. मृत कावेरी या ज्येष्ठ अभिनेते जयवंत वाडकर यांच्या पुतणी आहे. यामुळे त्यांनी देखील या घटनेवर संताप व्यक्त केला आहे.

या घटनेनंतर त्यांनी संताप व्यक्त करत या प्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणी केली. वाडकर यांनी आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. घटनेनंतर कावेरी यांच्याबद्दल भावुक करणाऱ्या आठवणीही शेअर केल्या. त्यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे.

आरोपींना अजिबात दया दाखवली जाऊ नये, मला तर म्हणायचे आहे की, असल्या लोकांना एक सॉलिड कायदा काढला पाहिजे आणि फाशी द्यायला पाहिजे. ज्या विकृत पद्धतीने गाडी चालवून एखाद्या जीव घेणं हे त्या माणसालासुद्धा समजलं पाहिजे. गाडी समोर साधा उंदीर जरी आला तरी आपण गाडी थांबवतो किंवा त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो, असेही ते म्हणाले.

एखादी व्यक्ती आपल्या गाडीच्या बोनटवर आहे, तिला दीड-दोन किलोमीटर घसरत घेऊन जाणं म्हणजे किती वाईट गोष्ट आहे? तिथे गाडी सोडून नंतर पळून जाणं म्हणजे खूपच वेदनादायक गोष्ट आहे, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केला आहे.