मारकडवाडी गावात बॅलेट पेपरद्वारे मतदान घेण्याचा ग्रामस्थांचा निर्णय अखेर पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे मागे घेतला गेला आहे. या प्रकरणावरून काही दिवसांपासून गावात तणाव निर्माण झाला होता. सोमवारी पोलिसांनी गावात जमावबंदी लागू केली होती, तरीही ग्रामस्थ मतदानाच्या प्रक्रियेवर ठाम होते.
आज सकाळी ग्रामपंचायतीबाहेर नागरिकांची गर्दी जमली होती, मात्र पोलिसांच्या इशाऱ्यानंतर आणि शरद पवार गटाचे आमदार उत्तमराव जानकर यांच्या मध्यस्थीनंतर मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेण्यात आला. पोलिसांनी बॅलेट पेपरद्वारे मतदान केल्यास कलम 144 अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील आणि मतपत्रिका तसेच साहित्य जप्त केले जाईल, असा निर्वाणीचा इशारा दिला.
या पार्श्वभूमीवर उत्तमराव जानकर यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, “मतदानासाठी तयारी झाली असली तरी पोलिसांनी विरोध केला. त्यामुळं गोंधळ आणि झटापटीची शक्यता होती. त्यामुळे तातडीने मतदान प्रक्रिया थांबवण्याचा निर्णय घेतला.”
मारकडवाडीतील निवडणुकीच्या आधीच निकालाबाबत वाद सुरु होता. जानकर यांच्या मते, “या गावात 1500 मतं झाल्याशिवाय निकाल स्पष्ट होऊ शकत नाही. माझ्या अनुमानानुसार मला 1400 आणि समोरच्याला 502 मते मिळाली असती. पण अधिकृत निकालात समोरच्याला 1003 मते मिळाल्याचे दिसून आले, जे दुप्पट होते.”
मतदान प्रक्रिया रद्द केल्यानंतर जानकर यांनी हा मुद्दा प्रांताधिकारी आणि निवडणूक आयोगाकडे घेऊन जाण्याचा निर्धार व्यक्त केला. “मारकडवाडीतील निवडणुकीतील अनियमितता आम्ही सोडणार नाही. न्याय मिळाल्याशिवाय थांबणार नाही,” असे त्यांनी ठामपणे सांगितले.
मारकडवाडीतील या घटनाक्रमामुळे राजकीय वातावरण तापले असून पुढील घडामोडींकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.