राज्यातील महायुती सरकारच्या महत्त्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या लाभार्थी महिलांच्या तक्रारींची छाननी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निकष पूर्ण न करणाऱ्या महिलांचे अर्ज बाद केले जातील, असे सांगण्यात आले आहे.
महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर, या योजनेबाबत ते सातत्याने सकारात्मक भूमिका घेत आहेत. फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार, “लाडकी बहीण योजना सुरूच राहील. त्याअंतर्गत महिलांना दरमहा 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे, आणि लवकरच या निर्णयाची अंमलबजावणी होईल.”
सध्या या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा 1500 रुपये दिले जातात. लाभाची रक्कम 2100 रुपयांपर्यंत वाढवण्यासाठी येत्या अर्थसंकल्पात तरतूद करण्यात येईल. मात्र, योजनेचा अपव्यय होऊ नये म्हणून सरकारने काही अर्जांची छाननी करण्याचा निर्णय घेतला आहे.
केवळ तक्रारी आलेल्या अर्जांचीच तपासणी होणार असून सर्व अर्ज तपासणे शक्य नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. सध्या या योजनेचा लाभ 2 कोटी 34 लाख महिला घेत आहेत. योजनेत वेळोवेळी बदल करण्यात आले असून, कुटुंबातील 21 ते 65 वर्षे वयोगटातील सर्व महिलांना याचा लाभ मिळणार आहे.
यापूर्वी हा लाभ फक्त कुटुंबातील एका महिलेपुरता मर्यादित होता. या बदलामुळे मोठ्या प्रमाणावर महिलांना लाभ मिळाला आहे. आता योजनेत निकषांचे काटेकोर पालन करण्यात येणार असल्याने किती अर्ज बाद होतात आणि किती महिलांना याचा लाभ मिळतो, याकडे लक्ष लागले आहे.