बीड खंडणी प्रकरणाला वेगळं वळण? गँगस्टर निलेश घायवळसोबत सुरेश धसांचा फोटो आला समोर

धनंजय मुंडे यांच्यावर खंडणीखोरी आणि गुन्हेगारीचे आरोप करणारे भाजपचे आष्टीचे आमदार सुरेश धस स्वतःही अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुण्यातील कुख्यात गँगस्टर निलेश घायवळसोबत सुरेश धस यांचे फोटो व्हायरल झाले आहेत, ज्यामुळे बीडमधील पवनचक्की खंडणी प्रकरणाशी त्यांचा काही संबंध आहे का, अशी चर्चा सुरू झाली आहे.

गँगस्टर निलेश घायवळचे आमदार सुरेश धसांसोबतचे फोटो व्हायरल झाल्यानंतर, रविवारी पुण्यात सुरेश धस यांनी राष्ट्रवादीचे पदाधिकारी नितीन बिक्कड यांच्यावर पवनचक्की प्रकल्प अधिकाऱ्यांकडून खंडणी वसुलीची डील केल्याचा आरोप केला होता.

घायवळकडून बिक्कडला धमकी?

नितीन बिक्कड हा पवनचक्की ठेकेदार आहे, आणि घायवळ गँगने त्याला धमकी दिल्याचे समोर आले आहे. या धमकीच्या एफआयआर प्रतीनुसार, बिक्कडला धमकी का दिली गेली, यावर चर्चा सुरू आहे. पवनचक्की प्रकल्पाच्या कंत्राटातून की इतर कोणत्या कारणांमुळे घायवळ गँगने बिक्कडला लक्ष्य केले होते, यावर चर्चेला उधाण आले आहे.

पुणे कनेक्शन काय?

बीडमधील पवनचक्की प्रोटेक्शन खंडणीवरून संतोष देशमुख हत्या प्रकरण घडल्याचा आरोप आहे. भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या पाटोदा तालुक्यात सर्वाधिक पवनचक्क्या आहेत, आणि बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी बीडच्या खंडणी प्रकरणाचे पुणे कनेक्शन असल्याचा आरोप केला आहे. गँगस्टर घायवळ जरी पुण्यात असला तरी मूळचा जामखेडचा असल्याने बीडच्या खंडणी प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे.

सुरेश धस यांचे आरोप

पुण्यातील सभेत सुरेश धस यांनी सांगितले की, 14 जून 2024 रोजी धनंजय मुंडे यांच्या परळीतील बंगल्यावर अवादा कंपनीचे अधिकारी, वाल्मिक कराड, नितीन बिक्कड यांच्यासह बैठक झाली होती. त्यानंतर 19 जून रोजी मुंबईतील बंगल्यावर दुसरी बैठक झाली, ज्यामध्ये खंडणीसाठी 3 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली. कंपनीने 2 कोटी रुपये देण्याची तयारी दर्शवली होती, असा आरोप धस यांनी केला.