बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची निर्घृण हत्या करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात प्रकरण चांगलेच तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणात सुरुवातीपासूनच आक्रमक भूमिका घेतली आहे.
त्यांनी “आका” या व्यक्तीचा उल्लेख सातत्याने केला, ज्यामुळे सर्वांना उत्सुकता निर्माण झाली होती. धस यांनी आपल्या विधानांमध्ये “आका” म्हणजे वाल्मिक कराड असल्याचा दावा केला आहे, तर “आकाचा आका” म्हणजेच धनंजय मुंडे असल्याचे सांगितले आहे.
त्यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत मुंडे यांच्या संपत्तीबाबतही गंभीर आरोप केले. सुरेश धस यांनी विचारले की, पुण्यातील मगरपट्टा सिटीजवळील फ्लॅट जो ड्रायव्हरच्या नावावर आहे, तो खरोखरच मुंडे यांचा आहे का? तसेच, जैन मल्टीस्टेटची चौकशी सुरु असलेल्या प्रॉपर्टींमध्ये मुंडे यांच्या पत्नी आणि वाल्मिक कराड यांची नावे असल्याचा आरोप त्यांनी केला.
सुरेश धस यांनी धनंजय मुंडे यांना अजित पवार पाठिशी घालत असल्याचा आरोपही केला आहे. त्यांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली असून, अजित पवार त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडतील की नाही, याबाबत शंका व्यक्त केली. धस यांनी मुंडे यांच्यावर टीका करताना सांगितले की, मुंडे यांचे साम्राज्य आता इतके विस्तारले आहे की, त्यांच्याच अंधारात स्वतःलाच दिवा घेऊन फिरावे लागेल.