वाल्मिक कराडचा 21 ऑगस्ट 2024 चा ‘तो’ फोटो आला समोर, संजय राऊतांनी उडवून दिली खळबळ!

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येने राज्यात खळबळ उडाली आहे. रोज होणाऱ्या नव्या खुलास्यांमुळे राज्य सरकार मोठ्या अडचणीत सापडले आहे. विरोधकांनी या प्रकरणाचा धसका घेतला असून मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा मागितला जात आहे.

देशमुख हत्याप्रकरणात मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यांचे नाव आल्याने विरोधकांचा दबाव वाढला आहे. दरम्यान, शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी एक्स या समाजमाध्यमावर एक फोटो पोस्ट करून खळबळ उडवली आहे.

या फोटोमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि आरोपी वाल्मिक कराड यांच्यासोबत धनंजय मुंडे दिसत आहेत. फोटोवर 21 ऑगस्ट 2024 ही तारीख आहे. राऊत यांनी या फोटोसह मस्साजोगच्या ग्रामस्थांची दहशत आणि असुरक्षितता व्यक्त करत सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

भाजपाचे आमदार सुरेश धस यांनीही देशमुख हत्या प्रकरणावर आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांनी वाल्मिक कराडचा थेट सहभाग असल्याचा दावा करत त्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. धस यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.