पुण्यातील प्रसिद्ध इंजिनिअरिंग कॉलेजला ठोकले टाळे, ८०० विद्यार्थ्यांचे भवितव्य क्षणात अंधकारमय

पुण्याजवळील भोर तालुक्यातील वडवाडी येथे असलेल्या अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी कॉलेजवर बँक ऑफ बडोदाने ताबा घेतल्याने शेकडो विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात सापडले आहे. बँकेकडून ३२ कोटी रुपयांच्या थकबाकीमुळे न्यायालयाच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली असून, कॉलेजची इमारत आणि १४ हेक्टर क्षेत्र बँकेच्या नियंत्रणाखाली गेले आहे.

या घटनेमुळे कॉलेजच्या होस्टेलमधील सुमारे ८०० विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात आले असून, डिप्लोमा आणि डिग्री शाखांमध्ये शिकणाऱ्या एकूण १६५० विद्यार्थ्यांचे शिक्षण अडचणीत आले आहे. याशिवाय, इंग्लिश मीडियम स्कूलमधील सुमारे २५० विद्यार्थ्यांवरही याचा परिणाम झाला आहे.

अभिनव एज्युकेशन सोसायटीच्या या संस्थेत डिप्लोमाच्या सहा शाखा, डिग्रीच्या पाच शाखा, आणि इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षण दिले जात होते. १७ जानेवारीला होणाऱ्या परीक्षांच्या अनिश्चिततेमुळे अनेक विद्यार्थ्यांना चिंता सतावत आहे. २००९ पासून सुरू असलेल्या या कॉलेजमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागांतील ग्रामीण विद्यार्थ्यांनी शिक्षण घेतले आहे.

सध्या या कॅम्पसची मालमत्ता सुमारे १३२ कोटींची असून, कॉलेजच्या इमारती व साहित्यासह १०० कोटी रुपयांचे मूल्य आहे. या घटनेमुळे पुण्यात खळबळ उडाली असून, पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.