एसटी बँकेतील एका निरीक्षकाला लाच घेताना अटक केल्यानंतर विभागात खळबळ उडाली आहे. शिव परिवहन वाहतूक व कामगार सेनेचे सरचिटणीस संतोष शिंदे यांनी ॲड. गुणरत्न सदावर्ते आणि एसटी बँकेचे संचालक संजय घाटगे यांच्यावर लाच मागणीसाठी जबाबदार असल्याचा आरोप केला आहे.
शिंदे यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले की, एसटी बँकेत कर्मचाऱ्यांच्या गैरसोयीच्या ठिकाणी बदली केल्यानंतर, पुन्हा सोयीस्कर ठिकाणी बदली करण्यासाठी सदावर्ते आणि घाटगे हे पैसे घेतात. त्यांनी यावेळी संबंधित कर्मचाऱ्यांच्या कॉल रेकॉर्डिंग्सचे पुरावे मीडियासमोर सादर केले.
शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने एसटी बँकेचे निरीक्षक राहुल पुजारी यांना 1 लाख 10 हजार रुपयांची लाच घेताना अटक केली होती. शिंदे यांच्या मते, सदावर्ते आणि घाटगे यांच्याच सूचनेनुसार ही लाच मागणी होत होती.
शिंदे यांनी असा आरोप केला की, कर्मचारी पैसे देण्यास तयार नसल्यास त्यांची बदली गैरसोयीच्या ठिकाणी केली जाते. तसेच, कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करून त्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून 75 हजार रुपये दिले जातात आणि हे पैसे पुन्हा अनिल कोळी, संजय घाटगे यांच्या खात्यांत पाठवले जातात.
या आरोपांवर संजय घाटगे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, हा प्रकार कोल्हापूर शाखेत झालेला नाही आणि हा आरोप त्यांच्या विरोधात कुरघोडी करण्याचा प्रयत्न आहे. गुणरत्न सदावर्ते यांनीही सर्व आरोप फेटाळले असून, संतोष शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.