मुंबई: मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिकी कराड यांच्यावर कारवाईचा फास आणखी घट्ट झाला आहे. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडून सुरू असून, कराडविरोधात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी प्रतिक्रिया देताना, कोणताही आरोपी निर्दोष सुटणार नाही, असे स्पष्ट केले.
वाल्मिकी कराडची न्यायालयीन कोठडी
आज वाल्मिकी कराडची सीआयडी कोठडी संपल्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी सरकारी वकिल आणि कराडच्या वकिलांमध्ये जोरदार युक्तिवाद झाला. न्यायालयाने कराडला १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत पाठवले. त्याचवेळी, एसआयटीने मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करून कराडच्या कोठडीची मागणी केली. यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात कराडवर आणखी गंभीर आरोप लागू झाले आहेत.
सुरेश धस यांची प्रतिक्रिया
भाजप आमदार सुरेश धस यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, कोणत्याही आरोपीला सोडले जाणार नाही. ते म्हणाले, “वाल्मिकी कराड आरोपी आहे की नाही, हा मुद्दा नाही. मुद्दा संतोष देशमुख यांच्या हत्येचा आहे, आणि मुख्यमंत्र्यांनीही याबाबत कठोर भूमिका घेतली आहे. एसआयटीने आता कामाला सुरुवात केली आहे आणि गुन्हेगारांवर योग्य कारवाई होईल.”
कराडच्या वकिलांनी तपासावर प्रश्न उपस्थित केले
वाल्मिकी कराडच्या वकिलांनी तपासावर आक्षेप घेतला आणि १५ दिवसांची पोलिस कोठडी पुरेशी असल्याचे सांगितले. त्यांनी तपासात वापरल्या जाणाऱ्या तंत्रज्ञानावर भर दिला आणि पोलिस कोठडीची आवश्यकता नसल्याचा दावा केला. याआधी वाल्मिक कराड यांची 14 गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. 29 नोव्हेंबरला धमकी दिली तर त्या दिवशी गुन्हा का दाखल केला नाही असा सवाल करत खंडणी मागितली मग पैसे दिल्याचे पुरावे सरकारी वकीलांकडे नसल्याचा युक्तिवाद कराडच्या वकिलांनी मांडला.
सरकारी वकिलांचा दावा
सरकारी वकिलांनी युक्तिवाद करताना सांगितले की, कराडविरोधात पुरावे मिळाले आहेत, आणि त्याच्या बँक खात्यांची चौकशी करण्यात येत आहे. त्यामुळे पोलिस कोठडीची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता गुन्हेगारांवर कठोर कारवाई होण्याची शक्यता असून, तपास अधिक गतीने पुढे जाण्याची चिन्हे दिसत आहेत.