परळी: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर अखेर मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, ज्यामुळे त्याच्या अडचणी अधिक वाढल्या आहेत. सीआयडी कोठडी संपल्यानंतर न्यायालयात हजर करण्यात आलेल्या कराडवर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
मात्र, त्याच वेळी मकोका लागू करून एसआयटीने त्याचा ताबा घेण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने एसआयटीला कराडचा ताबा घेण्याची परवानगी दिली असून, उद्या त्याला पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे.
दरम्यान, मकोका अंतर्गत कारवाईनंतर कराडची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. चाचणी दरम्यान त्याची प्रकृती बिघडल्यामुळे त्याचा ईसीजी काढण्यात आला आहे.
परळीमध्ये समर्थक आक्रमक, आंदोलनाला वेग
वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ परळी शहरात आंदोलनाने जोर धरला आहे. सकाळपासूनच समर्थकांनी शहरात विविध ठिकाणी आंदोलन सुरू केले होते. एका समर्थकाने पाण्याच्या टाकीवर चढून निदर्शने केली, ज्यामुळे एकाला भोवळ आली. मात्र, कराडवर मकोका अंतर्गत कारवाई झाल्याची बातमी समोर येताच समर्थक अधिक आक्रमक झाले.
समर्थकांनी बेमुदत परळी बंदची घोषणा दिली असून, शहरात टायर जाळून निषेध करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे, एका ठिकाणी बसेसवर दगडफेक झाल्याची घटना देखील घडली आहे. या आंदोलनामुळे परळी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
परळीमध्ये पोलिसांनी सतर्कता वाढवली आहे आणि कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.