परळीत तणाव शिगेला: वाल्मिक कराड समर्थक आक्रमक, कार्यकर्त्यांनी स्वतःलाच जाळून घेतले

परळी: संतोष देशमुख हत्याप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या समर्थनार्थ सुरू असलेल्या आंदोलनाने आता उग्र रूप धारण केले आहे. दिवसभरात तीन समर्थकांनी अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता, मात्र नागरिकांनी त्यांना वेळीच वाचवले. रात्री उशिरा मात्र एक समर्थकाने अंगाला आग लावून घेतली.

या आगीत त्याचे पाय जळाले असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा धक्कादायक प्रकार पोलीस ठाण्याबाहेरच घडल्याने परिस्थिती अधिकच तणावपूर्ण झाली आहे.

कराड समर्थक दिवसभर आक्रमक होते. सकाळपासूनच आंदोलन सुरू असून, समर्थकांनी पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन केले. यावेळी एका कार्यकर्त्याला भोवळ आली होती. आंदोलनात वाल्मिक कराड यांची आई देखील सहभागी झाली होती, परंतु प्रकृती खालावल्यानंतर त्यांनाही वैद्यकीय मदत घ्यावी लागली.

वाल्मिक कराडवर मकोका अंतर्गत कारवाई झाल्यानंतर आंदोलन अधिकच तीव्र झाले आहे. समर्थकांनी परळी शहरात बेमुदत बंदची घोषणा केली असून, टायर जाळून आणि दगडफेक करून निषेध नोंदवला आहे. बसवर झालेल्या दगडफेकीमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

न्यायालयीन सुनावणी आणि मकोका अंतर्गत कारवाई

वाल्मिक कराड यांची सीआयडी कोठडी संपल्यानंतर आज सकाळी त्याला न्यायालयात हजर करण्यात आले होते. सीआयडी कोठडीची मागणी फेटाळत, न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली. मात्र त्याच दरम्यान, मकोका अंतर्गत कारवाई करून एसआयटीने त्याला ताब्यात घेण्यासाठी न्यायालयात अर्ज केला, ज्याला न्यायालयाने मान्यता दिली. उद्या त्याला पुन्हा कोर्टात हजर केले जाणार आहे.

सध्या परळी शहरात तणावाचे वातावरण असून, पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी कडक बंदोबस्त तैनात केला आहे.