बीड: आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याप्रकरणी सीआयडीच्या ताब्यात असलेल्या वाल्मिक कराडला मंगळवारी मोठा झटका बसला आहे. सीआयडीने केज सत्र न्यायालयात सुनावणीदरम्यान कराडची 10 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
वाल्मिक कराडची कोठडी संपत असताना त्याला 14 जानेवारी रोजी पुन्हा बीडमधील केज न्यायालयात हजर करण्यात आले होते. पोलिसांनी यावेळी सांगितले की, अजून एक आरोपी फरार आहे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात अजून अनेक गोष्टींचा खुलासा व्हायचा आहे. याशिवाय, वाल्मिक कराडची राज्याबाहेर संपत्ती आहे का, याचाही तपास केला जात आहे. त्यामुळे कराडची सुटका सध्या अत्यंत कठीण असल्याचे दिसत आहे.
न्यायालयीन कोठडी मिळाल्यानंतर कराडची सुटका कठीण
खंडणी प्रकरणात न्यायालयाने वाल्मिक कराडला पोलिस कोठडीऐवजी न्यायालयीन कोठडी दिली आहे. परंतु, कराडवर मकोका (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) लागला असल्याने त्याला जामीन मिळणे आता कठीण होणार आहे. मकोका लागल्यावर आरोपी बहुतेक वेळ न्यायालय आणि कोठडीमध्येच अडकलेला असतो.
खंडणी आणि खुनाच्या प्रकरणात सहा फोन कॉल्सचा धागा
मकोका लागू झाल्यानंतर पोलिसांनी पुन्हा तपासाची गती वाढवली आहे. वाल्मिक कराडवर संतोष देशमुख हत्या प्रकरणात गुन्हा दाखल होण्याची शक्यता वाढली आहे. पोलीस न्यायालयात कराडची पुन्हा पोलीस कोठडी मागण्याची शक्यता आहे.
पोलिसांच्या तपासानुसार, खंडणी प्रकरण आणि संतोष देशमुख यांचा खून या दरम्यान विष्णू चाटेसह खून प्रकरणातील आरोपी आणि ज्यामध्ये वाल्मिक कराड यांच्यात सहा फोन कॉल्स झालेले आहेत. त्यामुळे खंडणी प्रकरण, संतोष देशमुख यांना झालेली मारहाण आणि संतोष देशमुख यांच्या हत्येचे धागेदोरे कराडसोबत जोडले जात आहेत.