बुलढाणा: अनैतिक संबंधाआड येणाऱ्या पतीला पत्नीने पेटवून दिले, उपचारादरम्यान मृत्यू

बुलढाणा: अनैतिक संबंधात अडसर ठरत असल्याने पत्नीने पतीवर पेट्रोल टाकून त्याला जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्यरात्री बुलढाणा शहराजवळील तार कॉलनीत घडली. या घटनेत पती रणधीर हिंमत गवई (माजी सैनिक) गंभीर जखमी झाले होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

वादातून प्राणघातक हल्ला

मेहकर तालुक्यातील पाचला गावचे रहिवासी रणधीर गवई आणि त्यांची पत्नी लता गवई (वय ४१) हे विभक्त राहत होते. दोघांमध्ये न्यायालयीन वाद सुरू होता. १३ जानेवारीच्या रात्री रणधीर पत्नीच्या घरी आले. मध्यरात्री दोन वाजता दोघांमध्ये वाद झाला. या वादातून संतापलेल्या लताने पतीच्या अंगावर पेट्रोल टाकून त्यांना जिवंत पेटवले. शेजाऱ्यांनी आरडाओरड ऐकून आग विझवण्याचा प्रयत्न केला.

गंभीर दुखापतीमुळे मृत्यू

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि गंभीररित्या भाजलेल्या रणधीर यांना तत्काळ जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. पुढे त्यांना बुलढाणा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना रणधीर यांचा मृत्यू झाला.

मृत्यूपूर्व जबानीमुळे पत्नीवर गुन्हा दाखल

रणधीर यांनी निधनाआधी पोलिसांना दिलेल्या जबानीत अनैतिक संबंधांमुळे पत्नीने त्यांना जिवंत पेटवल्याचा आरोप केला होता. या जबानीच्या आधारे पोलिसांनी लता गवई यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. पत्नीला अटक करण्यात आली असून तिच्याविरोधात विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

परिसरात खळबळ

या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून रणधीर गवई यांच्या निधनामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. बुलढाण्यातील ही घटना पहिली नसून यापूर्वीही अनैतिक संबंधांमुळे हत्या झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत.