बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामुळे कॅबिनेट मंत्री धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढत आहेत. मुंडेंचे निकटवर्तीय वाल्मिक कराडला सीआयडीने अटक केल्यानंतर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, ज्यामुळे कराडची सुटका सध्या थांबली आहे.
वाल्मिक कराड चौकशीच्या कचाट्यात सापडल्याने विरोधी पक्षांसह सत्ताधारी पक्षाकडून धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होऊ लागली आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही याबाबत दबाव टाकला जात असल्याचे समजते.
या घटनाक्रमादरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी धनंजय मुंडेंना मोठा झटका दिला आहे. बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादी अजित पवार गटाची संपूर्ण कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार बीड प्रकरणावर वेट अँड वॉचच्या भूमिकेत होते.
मात्र आता त्यांनी थेट धनंजय मुंडेंच्या गटावर कारवाई केल्याने हा धक्का मानला जात आहे. बीड जिल्ह्यातील कार्यकारिणी बरखास्त केल्याची माहिती बीडचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी दिली. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या सूचनेनुसार, मंगळवारपासून सर्व कार्यकारिणी बरखास्त करण्यात आली आहे.
पुढे जिल्हा पदाधिकारी निवडताना चारित्र्य पडताळणी करण्यात येणार आहे आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या व्यक्तींना पक्षात प्रवेश न देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याआधी बीड जिल्ह्यातील कार्यकारिणी धनंजय मुंडेंच्या सल्ल्यानुसार नियुक्त केली जात होती, त्यामुळे अजित पवारांच्या या निर्णयामुळे धनंजय मुंडेंना मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.